डान्सबारील बंदी उठविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असला तरी राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होऊ नयेत हीच राज्य सरकारची भूमिका आहे, असे ठाम मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

सुप्रीम कोर्टाने मागील महिन्यात डान्सबार बंदीच्या कायद्याच्या अंमलबजावणीला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने गुरूवारी फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्हाला आदर आहे, पण राज्यात डान्सबार पुन्हा सुरू व्हावेत याला आमचा तत्वत: विरोध आहे. त्यादृष्टीने सर्व कायदेशीर पर्यायांची पडताळणी करून कायद्यात बदल करता येईल का याबाबतची चाचपणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.