शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. ज्यांनी ‘मनोगत’ पाक्षिकाच्या प्रती जाळल्या त्यांनी स्वतःच्या वर्तमानपत्राच्या जाळपोळीसही तयार राहावं, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे. आज मुंबईत पंतप्रधानांच्या मन की बात हा कार्यक्रम जनतेसोबत ऐकण्यासाठी ‘मन की बात, चाय के साथ’ या कार्यक्रमाचे आयोजन भाजपकडून करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
शेलारांनी शिवसेनेला इशारा देत आम्ही ‘दैनिक सामना’च्याही प्रती जाळू शकतो असे म्हटले आहे. तसेच, विकासाच्या प्रवाहाबाहेर राहणार्यांना जनता लोकशाही बाहेर ठेवेल असे म्हणत पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार्या शिवसेनेला शेलारांनी टोला लगावला. भाजपचे पाक्षिक असलेल्या ‘मनोगत’मधून भाजप प्रवक्ते माधव भंडारींनी उद्धव ठाकरे यांची तुलना शोले चित्रपटातल्या असरानींशी केली होती. त्यानंतर शिवसेनेने ठिकाठिकाणी आंदोलन करुन या पाक्षिकाची होळी केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी ‘शोले’ मधील गब्बरची उपमा दिली. नाशिकमध्ये हा लेख लिहिणारे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. या सर्व नाट्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी परस्परांवर टीका, टिप्पणी टाळावी. भाजपच्या कार्यकर्त्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत, शिवसेनेही तशा सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा खासदार दानवे यांनी व्यक्त केलेली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jun 2016 रोजी प्रकाशित
आम्हीही ‘दैनिक सामना’च्या प्रती जाळू शकतो; आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा
शेलारांनी शिवसेनेला इशारा देत आम्ही ‘दैनिक सामना’च्याही प्रती जाळू शकतो असे म्हटले आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 26-06-2016 at 16:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We can also burn your paper says ashish shelar to shivsena elar to shivsena