मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर जवळपास दोन आठवडे मुंबईसारख्या अतिसंवेदनशील शहराला पोलिस प्रमुख नव्हता. सत्यपाल सिंग यांच्या राजीनाम्यामुळे विविध स्तरांतून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली आणि तो रोषही आता मावळल्याचे दिसत आहे. मात्र, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्यपाल सिंग यांच्या वैचारिक अवस्थेवरच भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून सत्यपाल सिंग यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता, ‘प्रशासनातल्या सर्वोच्च पदावरच्या काही अधिकाऱ्यांचा समाजातल्या खालच्या थराबद्दल दूषित विचार तर नाही ना, हे तपासायला हवं’, असं म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची वैचारिक अवस्था काय आहे, हे पाहणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एखादा सेल असायला हवा, अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्यासारख्या बड्या नेत्यानेच सत्यपाल सिंग यांच्या वैचारिक अवस्थेबद्दल भाष्य केल्याने आता याला राजकीय रंग चढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनात काम केल्यावर कोणी कोणत्या पक्षात सामील व्हावं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे, असं पवारांनी नमूद केलं आहे. सत्यपाल सिंग ज्या पक्षात सामील झाले त्यावरून त्यांनी २०-३० वर्षांच्या नोकरीच्या काळात कोणत्या विचारांनी काम केलं यावरही पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राजकारणात आपण भांडणं करू, निवडणुका लढवू, पण प्रशासनात धर्मनिरपेक्ष लोक राहतील, याकडे आपण जास्त लक्ष देणं जरूरीचं आहे, असं आवानही शरद पवार यांनी देशातल्या सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना केलं आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2014 रोजी प्रकाशित
फेसबुकवरून सत्यपाल सिंग यांच्या ‘वैचारिक अवस्थे’वर पवारांचे भाष्य
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्यपाल सिंग यांच्या वैचारिक अवस्थेवरच भाष्य केलं आहे.
First published on: 24-02-2014 at 10:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We need secular people in government system sharad pawar