उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतल्या अजित पवार गटाच्या महिला मेळाव्यात जोरदार भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी महिला सशक्तीकरण, त्यासाठी केलेले प्रयत्न यावर जोर दिला. महाविकास आघाडी सरकार असताना आपण महिलांसाठी योजना आणल्या, कायदे केले. आता महायुती सरकारमध्येही आपण महिला अधिकाधिक प्रमाणात सक्षम व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतो आहोत. तसंच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम कायदेही आणत आहोत असंही म्हटलं. षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडलेल्या या मेळाव्यात अजित पवारांनी मोदींना तिसऱ्यांना निवडून देण्यासाठी महिला वर्गाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
“आपल्याला या देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना निवडून द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे. पाच राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या, तिथे जे निकाल लागले ते पाहा. ती राज्यं भाजपाच्या ताब्यात येण्याचं कारण महिला उत्स्फुर्तपणे बाहेर पडल्या आणि त्यांनी मतदान केलं. त्याचा परिणाम आपल्याला पाहण्यास मिळाला. आता लोकसभेची निवडणूक लवकरच येणार आहे. आपण सगळे महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहोत. जागा कुठल्या लढवायच्या ते आपण ठरवू. मात्र तुम्हाला सगळ्यांना बूथ पातळीवर काम करावं लागेल. फेब्रुवारी महिना संपला की आचारसंहिता लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी महायुतीच्या मेळाव्यांना उपस्थित राहिलं पाहिजे. तसंच मोदींना पुन्हा पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून द्यायचं यासाठी आपल्याला काम करायचं आहे.”
कुठल्याही घटकाला अडचण येऊ देणार नाही
कुठल्याही घटकाला आपण अडचण येऊ देणार नाही. कुठल्याही घटकाने अल्पसंख्याक, आदिवासी, बहुजन कुणीही असो, महिलांनाही मी सांगतो, सगळ्या महाराष्ट्राला मी सांगतो आहे. बाबांनो चिंता करु नका महाराष्ट्राच्या, देशाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. अटल सेतू हा २२ हजार कोटींचा पूल आहे. अशी कामं आपल्याला महाराष्ट्रात करायची आहेत. काळ्या आईची सेवा करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला, तिथे काम करणाऱ्या भगिनीलाही मदत आपण करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आम्ही कांद्याच्या प्रश्नावरही चर्चा केली. दुष्काळही काही भागांमध्ये आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. देशाच्या पंतप्रधानांनी जे ठरवलं आहे की पाच ट्रिलियन डॉलर ही अर्थव्यवस्था करायची, त्यात महाराष्ट्र मागे ठेवायचं नाही.
हे पण वाचा- “गृहखातं माझ्याकडे, फलटणचं पाणी चोरणाऱ्यांना…”, देवेंद्र फडणवीसांचा अंगुली निर्देश कोणत्या पवारांकडे?
दिलेला शब्द मागे घेणारा माणूस मी नाही
भाषणं करुन काही होणार नाही. कृती घडली पाहिजे, त्यासाठी आदितीही प्रयत्न करत असते ती कायम माझ्याकडे नव्या योजना घेऊन येत असतात. आपला देश वेगाने विकास करतो आहे. आपला महाराष्ट्रही मागे राहता कामा नये. विकास करण्यासाठी आपण महायुतीच्या सरकारमध्ये गेलो. महायुती सरकार हे विकास कामांसाठी कटिबद्ध आहेत. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात काम करतो आहे. कुणाला दिलेला शब्द फिरवणं, कुणाला फसवणं हे मला पटत नाही. माझं सगळं बोलणं रोखठोक असतं. ज्याचं काम होणार नाही त्याला मी थेट सांगत असतो. होत असेल तर तातडीने काम मार्गी लावत असतो. अशाच पद्धतीने आपण राष्ट्रवादी काँग्रेसला पुढे न्यायचं आहे. हे करताना कुणालाही वाऱ्यावर सोडायचं नाही. एकदा घेतलेल्या निर्णयापासून कधी बाजूला जायचं नाही हे लक्षात ठेवा. असंही अजित पवार म्हणाले.