चारच दिवसांपूर्वी मुंबईतून पूर्णपणे गायब झालेली थंडी पुन्हा एकदा चोराच्या पावलांनी परतली आहे. गेला आठवडाभर घामाच्या ‘धारानृत्या’त न्हाऊन निघालेल्या मुंबईकरांना शनिवारपासून गार वाऱ्यांचा आनंद मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या तापमानातही तीन ते चार अंशांनी घट झाली असून पुढील दोन ते तीन दिवस तापमान असेच राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीची लाट परतल्याचे सांगण्यात
आले.
जानेवारी महिन्यात मुंबईकरांना आल्हाददायक अनुभव देणाऱ्या थंडीने फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पळ काढला. मुंबईतील कमाल तापमानाने लगेचच तिशी पार करून एप्रिल-मे महिन्यातील दाहक उन्हाळ्याची जाणीवही करून दिली. त्यामुळे अनेक दिवसांनी घामाघुम झालेल्या मुंबईकरांनी ‘हाशहुश्श’ करायलाही सुरुवात केली होती. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये सतत दोन दिवस सुरू असणाऱ्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतातही थंडीची लाट परतली. ही लाट दक्षिणेकडेही सरकल्याने मुंबईतही तापमानात घट झाली. शनिवारी सकाळी मुंबईकरांचा दिवस सुरू झाला तोच थंडगार वाऱ्यांनी! हे वारे संध्याकाळ आणि त्यानंतर रात्रीपर्यंतही कायम होते. त्यातच महाबळेश्वर, पुणे भागांत पाऊस पडल्यानेही तापमानात घट झाली. ही थंडी पुढील दोन ते तीन दिवस मुक्कामाला असेल, असा अंदा वेधशाळेने वर्तवला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2013 रोजी प्रकाशित
पुन्हा फुलतोय थंडीचा काटा!
चारच दिवसांपूर्वी मुंबईतून पूर्णपणे गायब झालेली थंडी पुन्हा एकदा चोराच्या पावलांनी परतली आहे. गेला आठवडाभर घामाच्या ‘धारानृत्या’त न्हाऊन निघालेल्या मुंबईकरांना शनिवारपासून गार वाऱ्यांचा आनंद मिळत आहे.
First published on: 18-02-2013 at 03:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weather is cool again