अनिलकुमार गायकवाड, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक

मुंबई आणि नागपूरदरम्यानचे अंतर कमी करून प्रवासाचा कालावधी केवळ आठ तासांवर आणण्यासाठी ‘मुंबई ते नागपूर हिंदूूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’ची बांधणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) २०१९ पासून ७०१ किमीच्या या महामार्गाची बांधणी करीत आहे. हा प्रकल्प २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोना, टाळेबंदी आणि इतर कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला आहे. पण आता या प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून मार्च २०२३ नंतर मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासांत पार करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्याशी साधलेला सवांद.

Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
1311 objections to the proposed Shaktipeeth Highway
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोधासाठी १३११ हरकती
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…
  • मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाची गरज का भासली?

राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर, ही दोन्ही महत्त्वाची महानगरे. मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र हे अंतर अंदाजे ८२५ कि.मी. असून मुंबईहून नागपूरला रस्तेमार्गे जाण्यासाठी आजघडीला १५ ते १६ तास लागतात. हे अंतर कमी करण्यासाठी, ही दोन्ही महानगरे जवळ आणण्यासाठी आणि प्रवास केवळ आठ तासांत पूर्ण करता यावा यासाठी ७०१ कि.मी. लांबीचा मुंबई ते पुणे द्रुतगतीच्या धर्तीवर मुंबई ते नागपूर महामार्ग बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. एमएसआरडीसीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

  • समृद्धी महामार्गाची वैशिष्टय़े काय आहेत?

मुंबई ते नागपूर अंतर कमी करण्यासाठी संपूर्णत: नवीन मार्ग आखण्यात आला. ७०१ कि.मी. लांबीचा आणि सहा मार्गिकांचा हा प्रकल्प आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेला हा प्रकल्प राज्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी आहे. त्याच वेळी हा प्रकल्प राज्याच्या विकासाचाही ‘मार्ग’ ठरणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाडय़ाचा सामाजिक, आर्थिक विकास साधला जाणार आहे. या प्रकल्पामुळे येत्या काळात दोन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. महामार्गालगत १९ नगरे निर्माण करण्यात येणार आहे. तर महामार्गालगत सौर ऊर्जा प्रकल्पही राबविण्यात येणार आहे. एकूणच हा प्रकल्प वैशिष्टय़पूर्ण आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला २०१९ पासून सुरुवात झाली. या प्रकल्पाचे काम १६ टप्प्यांमध्ये सुरू आहे.

  • हा प्रकल्प मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी कसा आणि किती फायद्याचा ठरेल?

या प्रकल्पामुळे १० जिल्ह्यांचा आर्थिक, सामाजिक विकास होणार आहे. त्यातील एक जिल्हा म्हणजे ठाणे. ठाण्यातून हा मार्ग जात असून ७०१ कि.मी.पैकी ६८ कि.मी. मार्ग ठाण्यातून जाणार आहे. यासाठी येथे मोठय़ा संख्येने जमीन संपादित करण्यात आली आहे. ठाण्यातील टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत महामार्गालगत १९ नगरे विकसित करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात आठ नगरांची कामे हाती घेतली जाणार आहेत. यातील एक नगर ठाणे जिल्ह्यात असणार आहे. शहापूरमधील हिवरास येथे हे नगर विकसित करण्यात येणार आहे. याआधी फुगाळे येथे २,७१८ हेक्टर जागेवर हे नगर उभारण्यात येणार होते. मात्र काही अडचणींमुळे फुगाळे नगर रद्द करण्यात आले. आता हिवरास येथे नगर वसविण्यात येणार आहे. या नगरामुळे येत्या काळात ठाणे जिल्ह्याचा आर्थिक, औद्योगिक विकास साधला जाणार आहे. तर मुंबई महानगर प्रदेशातील जेएनपीटीशी हा मार्ग जोडण्यात आल्याने राज्याच्या आयात, निर्यातीत वाढ होणार आहे.

  • जेएनपीटीशी महामार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे नेमका काय फायदा होईल ?

जेएनपीटी हे देशातील एक सर्वात मोठे बंदर असून या बंदराशी समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे. देशातील सर्वाधिक मालवाहतूक या बंदरातून होते. अशा वेळी समृद्धी महामार्गाद्वारे अनेक जिल्हे जेएनपीटीशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे मालवाहतुकीला चालना मिळेल. तसेच आयात, निर्यातही वाढेल. शेतकऱ्यांना आपला नाशवंत माल जलदगतीने मुंबईत वा परदेशात पाठवता येईल. एकूणच यामुळे भविष्यात जेएनपीटीतील मालवाहतुकीतही वाढ होईल.

  • समृद्धी महामार्गावरून प्रवासासाठी किती टोल भरावा लागेल?

समृद्धी महामार्गावर २६ टोलनाके असून यातील दोन टोलनाके मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजेच एक ठाण्यात आणि एक नागपूरमध्ये असेल. तर उर्वरित २४ टोलनाके २४ इन्टरचेंजेसवर आहेत. २६ टोलनाक्यावरील टोल वसुलीसाठी निविदा काढण्यात आल्या असून लवकरच निविदा अंतिम केली जाणार आहे. नेमका टोल किती असणार, हा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येतो. टोल किती असेल हे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १ रुपये ६५ पैसे प्रति कि.मी. दराने टोल वसुली केली जाणार आहे. त्यानुसार चारचाकी हलक्या प्रवाशी वाहनांना मुंबई ते नागपूर ७०१ किमीच्या प्रवासासाठी ११५७ रुपये टोल द्यावा लागेल. तर जितका कि.मी. प्रवास तितकाच टोल वसूल केला जाणार आहे.

  • मुंबईकर कधीपासून आठ तासांत नागपूर गाठू शकतील?

या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. संपूर्ण मार्ग २०२१ मध्येच वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन होते. मात्र करोना, टाळेबंदी, तांत्रिक अडचणीमुळे कामास विलंब झाला आहे. आता कामाने वेग घेतला आहे. नागपूर ते शिर्डी आणि शिर्डी ते मुंबई अशा दोन टप्प्यांत प्रकल्प सेवेत दाखल करण्यात येणार होता. मात्र नागपूर ते शिर्डी या ५२० कि.मी.च्या टप्प्यातील पॅकेज ५ आणि ७ चे काम रखडले आहे. कंत्राटदार कंपनी आर्थिक अडचणीत असल्याने काम रखडले होते. पण आता मात्र सगळय़ा अडचणी दूर करुन रखडलेले काम वेगात सुरू करण्यात आले आहे. या दोन पॅकेजमधील काम पूर्ण होण्यास मेपर्यंत कालावधी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील उर्वरित टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आम्ही पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीऐवजी नागपूर ते वैजापूर, औरंगाबाद असा ३६० कि.मी. लांबीचा मार्ग फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करू आणि त्यानंतर हा मार्ग वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज असेल. महत्त्वाचे म्हणजे या ३६० किमी मार्गातील सेलूबाजार, वाशिम ते सिंदखेड राजा, बुलढाणादरम्यानचा टप्पा वगळण्यात येणार आहे. त्यामुळे या दरम्यान १२० किमीचा वळसा घालून, मुंबई ते नागपूर बाह्य रस्त्याचा वापर करावा लागेल. वैजापूर, औरंगाबाद ते शिर्डी तसेच सेलूबाजार ते सिंदखेडराजा टप्पा मेपर्यंत पूर्ण होईल. तर शिर्डी ते मुंबई टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानुसार पुढील वर्षांपासून मुंबईकर मुंबई ते नागपूर प्रवास केवळ आठ तासांत पूर्ण करू शकतील.

मुलाखत : मंगल हनवते