मुंबई : पश्चिम रेल्वेने तिकीट तपासणी मोहिमेअंतर्गत एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत विनातिकीट किंवा अनियमित तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड करून ५८.७९ कोटी रुपये दंड वसूल केला.
मुंबई उपनगरीय रेल्वे, मेल/एक्सप्रेस, सुट्टीतील विशेष ट्रेनमध्ये विनातिकिटे/अनियमित प्रवाशांना रोखण्यासाठी सघन तिकीट तपासणी मोहिमा सुरू आहेत. पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत सखोल तपासणी करून विनातिकीट प्रवाशांना पकडून एकूण ५८.७९ कोटी रुपये दंड वसूल केला. मागील वर्षी याच कालावधीच्या तुलनते यात १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच रेल्वे मंडळाने ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा दंड वसुली ११ टक्के अधिक आहे.
जून २०२५ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह २.४२ लाख विनातिकीट प्रवाशांना शोध घेऊन, त्यांच्याकडून १५.२४ कोटी रुपये वसूल करण्यात आले. याशिवाय जून २०२५ मध्ये पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये, फलाटावर ९० हजार विनातिकीट प्रवाशांना शोधून ४.१९ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्या आठ महिन्यांत धावत्या वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान विनातिकीट आणि सामान्य लोकलचे तिकीट असेलल्या १८ हजार ७५० प्रवाशांना पकडून सुमारे ६३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
मागील वर्षी याच कालावधीतील कारवाईच्या तुलनेत दंड वसुलीत ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान प्रवाशांनी कायम योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल, सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्याचे तिकीट, पास खरेदी करणाऱ्या तिकीटधारक प्रवाशांना गैरसोयीचा प्रवास करावा लागतो. विनातिकीट प्रवासी वातानुकूलित लोकल आणि प्रथम श्रेणी डब्यात घुसखोरी करतात.
अनेक वेळा विनातिकीट प्रवासी वातानुकूलित लोकलमध्ये बसून आणि तिकीटधारक प्रवासी उभ्याने प्रवास करीत असतात. असाच प्रकार प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी डब्यात घडतो. विनातिकीट प्रवाशांनी प्रवास केल्यास, रेल्वेची तिकीट विक्री कमी होऊन, महसुलावरही परिणाम होतो. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने सखोल तपासणी मोहीम सुरू केली आहे.
अनेक रेल्वे स्थानकावर ‘फोर्ट्रेस चेक’ मोहीम राबविण्यात येत आहे. रेल्वे स्थानकांतील पादचारी पूल, स्थानकाचे प्रवेशद्वार, फलाटांवर तिकीट तपासणीस, आरपीएफ जवान तिकीट तपासणी मोहीम राबवित आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.