पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे. विरार आणि चर्चगेट दोन्ही दिशेने वाहतूक व्यवस्थित सुरु आहे. अंधेरीत रेल्वे रुळावरुन कोसळलेल्या पूलाचा ढिगारा हटवण्यात आला असून रात्री एकच्या सुमारास चर्चगेटच्या दिशेने अप धीमा मार्ग मार्गही पूर्ववत करण्यात आला. अंधेरीजवळ ट्रेनच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे लोकल काही मिनिट उशिराने धावत आहेत असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

रात्री साडेदहाच्या सुमारास डाऊन धीम्या मार्गावर चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल सेवा सुरु झाली. त्याआधी रात्री आठच्या सुमारास अप जलद मार्ग सुरु झाला. दुर्घटनेनंतर तब्बल १२ तासांनी अंधेरीहून-चर्चगेटच्या दिशेने अप जलद मार्गावर पहिली लोकल रवाना झाली होती.

मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूलाचा काही भाग कोसळून रेल्वे रुळावर पडला. त्यामुळे बांद्रा ते अंधेरी दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती.

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक मंगळवारी सकाळी ठप्प झाली. या दुर्घटनेच्या वेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवत इमर्जन्सी ब्रेक मारल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मोटरमनने प्रसंगावधान दाखवले नसते तर पुलाचा काही भाग थेट ट्रेनवरच कोसळला असता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळला. यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली. ही दुर्घटना घडली त्यावेळी तिथून काही अंतरावरच लोकल ट्रेन होती. ही लोकल ट्रेन बोरिवलीवरुन चर्चगेटच्या दिशेने जात होती. मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना पुलाचा काही भाग कोसळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी इमर्जन्सी ब्रेक दाबला. यामुळे मोठा अनर्थ टळला.