मुंबई : ‘पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अंतःकरण जड झाले. सध्या देशात भीती, द्वेष आणि दहशत पसरविण्याचे काम सुरू आहे. आज सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली असून काश्मीर हा भारताचाच भाग होता, आहे आणि कायम राहणार, हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. कलाक्षेत्र कधीही न घाबरण्यासाठी ओळखले जाते. काश्मीर ही आपलीच जागा आहे. त्यामुळे यावर्षी आपण सर्वांनीच सुट्टीमध्ये फक्त काश्मीरमध्येच फिरायला जायचे, हे मनाशी पक्के केले पाहिजे’, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील सेवेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या निवेदनात केले.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या स्मृतिदिन सोहळ्याचे आणि चौथ्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचे गुरुवार, २४ एप्रिल रोजी मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मंगेशकर कुटुंबिय उपस्थित होते.

यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष व उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताच्या विकासात दिलेल्या योगदानासाठी प्रदान करण्यात आला. तसेच मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.

याप्रसंगी अभिनेते सुनील शेट्टी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सेवेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सुनील शेट्टी यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि भारतात भीती, द्वेष आणि दहशत पसरविण्याच्या प्रयत्नांना बळी न पडता भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरच्या भूमीत न घाबरता बिनधास्त फिरायला जाण्याचे आवाहन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आपण कधीही घाबरलो नाही. सगळ्यांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा निर्णय घेण्याची ताकदही भारतीयांमध्ये आहे’, असेही सुनील शेट्टी म्हणाले.