सर्वसामान्यांचे वाहन चोरीला गेले तर पोलीस किती तत्परता दाखवतात ते सर्वश्रुत आहे. पण खुद्द जर पोलिसांची आणि ती सुद्धा मंत्रालयाच्या सेवेत असलेली गाडी चोरीला गेली तर सरकारी यंत्रणा किती तत्पर होते हे दिसून आले. माहिम येथून शुक्रवारी पोलिसांची गाडी चोरीला गेली आणि अवघ्या दोन तासांत सापडलीही!
मंत्रालयातील बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांसाठी महेंद्रा बोलेरे ही गाडी तैनात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या ताब्यात ही गाडी असते. त्यांनी ही गाडी माहिमच्या मच्छिमार कॉलनी येथील इमारत क्रमांक आठ येथे उभी केली होती. मात्र तेथून ही गाडी चोरीला गेली. पोलिसांची गाडी त्यातही मंत्रालयातील गाडी चोरीला गेल्यामुळे यंत्रणा झटपट कामाला लागली. ही यंत्रणा एवढी तत्पर होती की, अवघ्या दोन तासांत ही गाडी दादरला सापडली. कुणी गाडी चोरली आणि कशी सापडली, ते मात्र समजू शकले नाही. पण पोलीस मागे लागल्याने चोराने ती सोडून दिली असावी, असे सांगितले जात आहे. गाडी सापडल्याच्या वृत्ताला माहिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दुजोरा दिला. मात्र अधिक तपशील देण्यास नकार दिला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची आमदार कन्या प्रणिती शिंदे यांची गाडी चोरीला गेली होती. ती गाडीसुद्धा पोलिसांना काही तासांतच सापडली होती. त्यामुळे  अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या चोरलेल्या गाडय़ा काही तासांत कशा सापडतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.