Mumbais Newly Inaugurated Worli Metro Station Flooded : पावसाने यंदा १२ दिवस लवकर हजेरी लावल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. तर पहिल्याच पावसात सरकारी यंत्रणांचा दावाही फोल ठरला आहे. महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला मेट्रो ३ प्रकल्पही पाण्यात बुडाल्याने मुंबईकर प्रवाशांची तारांबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्या संचालक व्यवस्थापक आश्विनी भिडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानक मार्गिकेतील आरे – बीकेसी पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी बीकेसी – आचार्य अत्रे चौक, वरळी हा दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र भुयारी मेट्रो स्थानकाच्या लोकार्पणानंतरच्या पहिल्याच पावसात मेट्रो सेवेचा बोजवारा उडाला. मुसळधार पाऊस कोसळू लागताच वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाण्याची गळती होऊ लागली. स्थानकात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे या वरळीतील भुयारी मेट्रो स्थानक जलमय झाले असून प्रवाशांना पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागले.

“संततधार पावसामुळे SWD नाल्यातून अचानक पाणी येऊन आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या निर्माणाधीन प्रवेशद्वारातून स्थानकात आले. त्यामुळे स्थानक बंद ठेवावे लागले आहे. मात्र उर्वरित वरळी- आरे मार्गावर सेवा सुरळीत चालू आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत सुमारे २४ हजार लोकांनी प्रवास केला”, अशी एक्स पोस्ट त्यांनी केली आहे.

दरम्यान, भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्यामुळे काही वेळ मेट्रोचे दरवाजे उघडले गेले नव्हते, त्यामुळे काही वेळ प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. काही वेळानंतर मेट्रोचे दरवाजे उघडले आणि प्रवासी बाहेर पडले. आचार्य अत्रे चौक या भुयारी मेट्रो स्थानकावर पाणी साचल्याची छायाचित्रे आणि चित्रफिती समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून नागरिकांकडून मेट्रो प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसंच, . प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून सर्व प्रणाली पूर्णपणे कार्यक्षम झाल्यानंतरच सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे ‘एमएमआरसी’ने स्पष्ट केले.