२६ नोव्हेंबर २००८च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी आणि सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याला ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर करता यावे याकरिता अमेरिकन न्यायालयाकडून परवानगी मागणारे पत्र देण्याची विनंती मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयाकडे केली असून न्यायालयाने त्यावरील निर्णय १८ नोव्हेंबपर्यंत राखून ठेवला. परंतु त्या आधी न्यायालयाने हेडलीबाबतच्या पोलिसांच्या तपासाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अमेरिकेकडून त्याला अटक करण्यात आल्यावर त्याच्याबाबत तपास का करण्यात आला नाही, अशी विचारणा करीत अन्य तपास यंत्रणांनी त्याच्याविरोधात गोळा केलेल्या पुराव्यावरच पोलीस यंत्रणा अवलंबून असल्यावर तसेच त्याला फरारी आरोपी न बनवल्याबाबत न्यायालयाने बोट ठेवले.