मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विहंग गार्डनमध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामासाठी आकारण्यात आलेल्या दंड व व्याजमाफीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगितले. सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरनाईक यांच्या प्रकल्पाला करण्यात आलेला दंड व त्यावरील व्याज माफ करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या विरोधात ठाण्यात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आवाज उठविला होता, तर भाजप नगरसेवकांनी निदर्शने केली. आता प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी लोकायुक्तांकडे धाव घेण्याचे जाहीर केले आहे. शिवसेना आमदाराच्या विरोधात भाजपने जाहीरपणे विरोधी भूमिका घेतली आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचे प्रशासनाने भासविणे, म्हणजे आयत्या पिठावर रेघोटय़ा असा प्रकार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रोच्या प्रशासनाविरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे, असा इशाराही पाटील यांनी दिला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला उमेदवारी देण्यावरून केलेल्या टिप्पणीवरून पाटील म्हणाले, उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी दिली तर त्यांना बिनविरोध विजयी करण्याची हमी शिवसेना आणि इतर पक्ष देणार का, असा सवाल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरावतीमध्ये महापालिका आयुक्तांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आदी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलविला, अशी टीका त्यांनी केली.