मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याचे पत्र देऊनही त्यावर अद्याप उत्तर आले नाही. लोकसभा निवडणुका कधीही होण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरून वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व ४८ जागा लढणार असल्याची घोषणा आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेसला प्रस्ताव हवा होता, तो आम्ही या पत्राच्या माध्यमातून दिला. परंतु त्यावर काँग्रेसने कसलेही उत्तर दिलेले नाही. दुसरे असे की, राज्यात शिवसेना (ठाकरे गट) व वंचित आघाडीची युती आहे. परंतु शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाचे सूत्र ठरलेले नाही. त्यामुळे शिवसेना व वंचित आघाडीतील जागावाटपाची चर्चाही थांबलेली आहे. लातूर, सातारा, बीड, सटाणा येथे सभा घेऊन निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करीत आहोत, असे आंबेडकर यांनी जाहीर केले.