मुंबईतील वरळी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका ३२ वर्षीय महिलेनं आपल्या पतीला शेवटचा फोन करून आत्महत्या केली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसह पिठाची गिरण चालवणाऱ्या व्यक्तीने व त्याच्या मुलाने चारित्र्यावरून केलेल्या टिप्पणीमुळे संबंधित महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे.
याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रावण आव्हाड (५०), अजिंक्य आव्हाड (२३) आणि दीपक काटकडे (४५) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, ३२ वर्षीय मृत महिला आपला पती, दोन मुली आणि सासू यांच्यासोबत वरळी परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर वास्तव्याला होत्या. १६ जानेवारी रोजी त्या गिरणीतून पीठ आणण्यासाठी गेल्या. यावेळी गिरणीत उपस्थित असलेल्या आरोपी अजिंक्यनं संबंधित महिलेला मोबाइल नंबर मागितला. पण त्यांनी फोन नंबर देण्यास नकार दिला. तसेच घरी येऊन त्यांनी घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला.
याच कारणातून दोन्ही कुटुंबात वाद झाला. यानंतर आरोपींनी मृत महिलेच्या चारित्र्यावरून अपशब्द उच्चारले. या घटनेनंतर दोन दिवसांनी (१८ जानेवारी) पती कामावर गेल्यानंतर पीडित महिलेनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी आपल्या पतीला फोन केला. “हा माझा शेवटचा कॉल असेल, आपल्या मुलींची काळजी घ्या” असं त्यांनी आपल्या पतीला सांगितलं.
पत्नीच्या फोननंतर पतीने तातडीने घरी धाव घेतली. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. पीडित महिलेनं घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.