मुंबई : मोटार नावावर करण्याच्या वादातून अंधेरीतील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) महिलेने गोंधळ घातला. सदर महिलेने आरटीओ कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याला मारहाण करून संगणकाची तोडफोड केली. सदर महिलेविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधेरी आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपीक वृषाली काळे यांच्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३२, १२२ (२), ३२४ (२), ३५२ अंतर्गत ईशा छाबराविरोधात गुन्हा दाखल केला.

मोटार नावावर करण्याचा हट्ट

ईशा सोमवारी आरटीओ कार्यालयात गेली होती. त्यावेळी तक्रारदार काळे व कनिष्ठ लिपीक सुश्मिता भोगले कार्यालयात काम करीत होत्या. ईशा त्यांच्याजवळ गेली आणि तिने आपली जीप कंपनीची मोटरगाडी कोणाला विकलेली नसतानाही ती स्नेहा पांडे यांच्या नावावर करण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्याबाबत कोणताही करार करण्यात आलेला नाही. त्यामुळे तात्काळ मोटरगाडी आपल्या नावावर करण्याची मागणी ईशाने केली. मोटरगाडी अशी तात्काळ नावावर करता येत नाही. स्नेहा पांडे यांनी आरटीओ विभागाकडे अर्ज व आवश्यक कायदपत्रे सादर केली आहेत, असे काळे यांनी ईशाला सांगितले.

आरोपीची आरडाओरड

कायदेशिरदृष्ट्या सर्व हस्तांतरण करण्यात आले आहे. याशिवाय ईशा यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती त्यांना देण्यात आली आहे, असे वृषाली काळे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर महिलेने जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरूवात केली. कनिष्ठ लिपीक सुश्मिता भोगले यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ईशा आरडाओरडा करीतच होती. संतापाच्या भरात ईशाने तेथील संगणक खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा स्टँड तुटला.

अखेर ईशा पोलिसांच्या ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूणच गोंधळ उडाल्यामुळे काळे यांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून तक्रार केली. त्यामुळे संतापलेल्या ईशाने दालनात शिरून शिवीगाळ केली. यावेळी काळे यांनी त्यांच्या मोबाइलवर चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता ईशाने त्यांचा हात पिरगळला व त्यांचा मोबाइल हिसकावून कार्यालयातून बाहेर पडली. त्यावेळी सर्वजण ईशाच्या मागे धावले व मोबाइल घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ईशाने सुश्मिता भोगले यांना ठोसा मारला. त्यावेळी ईशाच्या हातातील काळे यांचा मोबाइल खाली पडला व त्याचे नुकसान झाले. त्यावेळी अंबोली पोलिसांची मोबाइल व्हॅन तेथे आली आणि महिला पोलिसांनी ईशाला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.