मुंबई : साकीनाका येथील परेरा वाडी परिसरातील एका इमारतीची संरक्षक भिंत शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास लगतच्या झोपडीवर कोसळली. या दुर्घटनेत मंगला गावकर (४५) यांचा मृत्यू झाला.

मुंबईत शुक्रवारी सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसत होत्या. दुपारनंतर उपनगरांमध्ये पावसाने जोर धरला. त्यावेळी अनेक ठिकाणच्या सखलभागांमध्ये पाणी साचले. दरम्यान, साकीनाक्यातील गुलाब बाबा सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. ही भिंत लगतच्या झोपडीवर पडल्याने मंगला गावकर गंभीर जखमी झाल्या.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. स्थानिक रहिवाशांनी मंगला गावकर यांना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या एक्सझोन रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.