दादर येथे पदपथावरून पळवून नेलेल्या दोन महिन्यांच्या मुलीचा शोध लावण्यात शिवाजी पार्क पोलिसांना यश आले आहे. या मुलीची सुखरूप सुटका करुन पोलिसांनी अपहरणकर्त्यां पाच महिलांना अटक केली आहे. मुले पळविणारी ही टोळी असल्याचे तपासात उघड झाले आहे.
दादर पश्चिमेच्या केशवसुत उड्डाणपूलाखाली गिता शर्मा (२६) ही महिला रहाते. याच ठिकाणी त्या आणि त्यांचे कुटुंबीय फुलांची विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवितात. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास तिची दोन महिन्यांची मुलगी किर्तीका बेपत्ता असल्याचे लक्षात आले. झोपेत असताना कुणीतरी तिला पळवून नेले होते. शिवाजी पार्क पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला. ‘मूल चोरी’ प्रकरणात काही महिलांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून तपास करीत बुधवारी चेंबूर येथून किर्तिकाची सुटका केली.
किर्तिकाला पळविणाऱ्या सुनिता शेख (२४) आणि रेखा सिंग (४०) या दोन महिलांना अटक केली. त्यांच्या टोळीतील आयेशाबीबी शेख (४१), हाजराबी अझीज (५२) आणि पाकिजा शेख (२५) या अन्य तीन महिलांनाही अटक करण्यात आली आहे.
या टोळीत अन्य महिलांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मूल पळवून ते विकण्याचा या आरोपी महिलांचा प्रयत्न होता.
यापूर्वीही त्यांनी अशा पद्धतीचे काही गुन्हे केले असावे का याचा पोलीस तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक परशुराम काकड आणि गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक बने यांच्या पथकाने ही कामगिरी केली. अटक केलेल्या काही महिला मोलमजुरी करतात तर काही गृहिणी आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2014 रोजी प्रकाशित
मुले पळविणारी महिलांची टोळी अखेर अटकेत
दादर येथे पदपथावरून पळवून नेलेल्या दोन महिन्यांच्या मुलीचा शोध लावण्यात शिवाजी पार्क पोलिसांना यश आले आहे. या मुलीची सुखरूप सुटका करुन पोलिसांनी अपहरणकर्त्यां पाच महिलांना अटक केली आहे.
First published on: 06-02-2014 at 12:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women gang arrested for child trafficking