राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यामागे शरद पवार यांचा पक्षवाढ अथवा अधिक मते मिळविण्याचा हेतू असल्याची टीका होत असली तरी प्रत्यक्षात हे धोरण सामाजिक परिवर्तनासाठी राबविण्यात आल्याचे ठाम प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी अंबरनाथ येथे महिला मेळाव्यात बोलताना केले. यशवंतराव चव्हाणांच्या या महाराष्ट्रात दोन दशकांपूर्वी शरद पवार यांनीच महिलांसाठी पहिले धोरण जाहीर केल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
अंबरनाथमधील कमलधाम वृद्धाश्रम, प्राचीन शिवमंदिर, आयुध निर्माणी कारखाना, भाऊसाहेब परांजपे शाळा, महात्मा गांधी विद्यालय आदी ठिकाणांना भेट देऊन दुपारी दोन वाजता सुप्रिया सुळे गावदेवी मैदानात आल्या.
जिल्ह्य़ातील तब्बल पाच हजार महिलांची उपस्थिती असलेल्या या मेळाव्याप्रसंगी आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा आमदार विद्या चव्हाण, सरचिटणीस दर्शना दामले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सारिका गायकवाड, प्रदेश प्रवक्ते मह्ेश तपासे आदी उपस्थित होते.
विकसीत राष्ट्रासाठी रस्ते, पाणी, वीज, आणि शिक्षण या सुविधांबरोबरीनेच महिला सक्षमीकरणाची नितांत आवश्यकता असून राष्ट्रवादीचे ते एक प्रमुख उद्दिष्ट आहे. शासन आता महिलांसाठी तिसरे धोरण जाहीर करणार असून त्यात कोणकोणत्या तरतुदी असाव्यात हे समजून घेण्यासाठी राज्यभर महिला मेळावे घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
२१ व्या शतकात  दर हजारी पुरूषांमागे ८५० महिला ही जनगणनेची आकडेवारी चिंताजनक असून समाजाच्या हितासाठी प्राधान्याने हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.