दादरमध्ये येत्या आठवडय़ापासून सुरुवात; स्त्री-पुरुष समानतेच्या उद्देशाने पाऊल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंद्रायणी नार्वेकर

स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने राज्याच्या वाहतूक विभागाने आणखी एक पाऊल टाकले आहे. रस्त्यावरील सिग्नलच्या दिव्यांमध्ये आता पुरुषांच्या चिन्हाकृतींबरोबरच महिलांच्या चिन्हाकृतींनाही बरोबरीचे स्थान मिळणार आहे. मुंबईत येत्या आठवडय़ापासून हा बदल होत आहे.

वाहन चालकांमध्ये महिलांचे प्रमाण मोठे आहे. तरीही सिग्नलमध्ये केवळ पुरुषाची चिन्हाकृती वापरण्यात येते. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सर्व सिग्नलमध्ये दोन दिवसांत स्त्री चिन्हाकृती दिसतील. दादर परिसर समाविष्ट असणाऱ्या पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाने हा बदल केला आहे. या विभागात येणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील (कॅडल रोड) १२० सिग्नलवर स्त्री चिन्हाकृती दिसतील.

या सिग्नलच्या शेजारीच महिलांचे चित्र असलेले वाहतूक फलकही बसवण्यात येणार आहेत. लिंग समानतेच्या दृष्टीने हा प्रतिकात्मक बदल करण्यात येत आहे. हा छोटासा बदलही आधुनिक काळातील महिलांना मानाचे स्थान मिळवून देणारा आहे.

बदल या १३ ठिकाणी

स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या सुशोभीकरणाचे काम जी उत्तर विभागाने ‘कल्चरल स्पाइन प्रोजेक्ट’अंतर्गत हाती घेतले आहे. या मार्गावरील सिद्धिविनायक मंदिर, कीर्ती महाविद्यालय, म्हात्रे चौक, सूर्यवंशी सभागृह, चैत्यभूमी, केळूस्कर मार्ग (उत्तर व दक्षिण), रोड नं. ५, टी. एच. कटारिया मार्ग, हिंदुजा रुग्णालय, शितलादेवी मार्ग, मखदुम शाह दर्गा, माहीम पोलीस ठाणे या १३ वाहतूक जंक्शनवरील १२० सिग्नलमध्ये हा बदल येत्या दोन दिवसांत होणार आहे. सध्या बरीस्ताजवळच्या सिग्नलवर हा बदल केला असून तो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बदल करण्यासाठी आम्ही वाहतूक विभागाची परवानगी मागितली होती. असे काही बदल करणे ही गोष्ट त्यांच्यासाठीही नवीन होती. मात्र त्यांनी आम्हाला परवानगी दिली असून येत्या दोन दिवसांत या मार्गावरील सगळ्या सिग्नल यंत्रणेत हा बदल दिसेल.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, जी उत्तर

जगभरातील प्रयोग

* जगात अनेक शहरांनी वाहतूक दिव्यांच्या चिन्हांकृमध्ये बदल केले आहेत.

* स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा शहरातील वाहतूक सिग्नलवर महिला छबी आहे.

* जर्मनीतील तीन शहरांत रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी सिग्नल दिव्यांमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांच्या चिन्हाकृती आहेत.

* नेदरलँड्समधील काही शहरांत २००० पासून पोनीटेल असलेली ‘सोफी’ ही स्त्री आकृती सिग्नलच्या दिव्यांमध्ये झळकत आहे.

* व्हिएन्ना आणि लिंझ शहरांतही समलैंगिक युगुलाच्या आकृतीला सिग्नलमध्ये स्थान देण्यात आले आहे.

* ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील सिग्नल दिव्यांमध्येही स्त्री चिन्हाकृतीचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens signs now on traffic signals abn
First published on: 02-08-2020 at 00:34 IST