सुधीर मोघे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९३९ रोजी किलरेस्करवाडी येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. ८० च्या दशकात स्वरानंद संस्थेच्या आपली आवड या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाने त्यांची मुशाफिरी सुरू झाली. ‘शब्दांना दु:ख नसते, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात ओझे, जे तुमचे आमचे असते’ असे म्हणणाऱ्या सुधीर मोघे यांचे शब्दांशी नाते जडले होते. मूळ बाणा कवीचा असल्याने मोघे यांनी चित्रपटांसाठी गीतलेखन केले असले तरी कविता हेच त्यांचे पहिले प्रेम राहिले. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा-माधव’ या चित्रपटासाठी त्यांनी अखेरचे गीतलेखन केले. काव्यावर आधारित त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
गीतलेखन, गद्यलेखन करण्याबरोबरच त्यांनी संगीतकार म्हणूनही काम केले. ‘कशासाठी प्रेमासाठी’ हा मराठी आणि  ‘सूत्रधार’ या हिंदूी चित्रपटासह त्यांनी ‘स्वामी’, ‘अधांतरी’, ‘नाजुका’ या मराठी आणि ‘हसरते’, ‘डॉलर बहू’, ‘शरारते’ या हिंदूी मालिकांसाठी संगीत दिग्दर्शन केले. ‘कविता पानोपानी’, ‘नक्षत्रांचे देणे’, ‘मंतरलेल्या चैत्रबनात’, ‘स्मरणयात्रा’, ‘स्वतंत्रते भगवती’ आणि रॉय-किणीकर यांच्या कवितांवर आधारित ‘उत्तररात्र’ या रंगमंचीय कार्यक्रमांची संकल्पना, संहितालेखन आणि दिग्दर्शन मोघे यांचेच होते. राज्य सरकारचा सवरेत्कृष्ट गीतकार म्हणून चार वेळा मिळालेल्या पुरस्कारांसह गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य ना. घ. देशपांडे पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे शांता शेळके पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती मृण्मयी पुरस्कार, केशवसुत फाउंडेशनचा केशवसुत पुरस्कार आणि सोमण परिवारातर्फे शब्दस्वरप्रभू अजित सोमण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कला प्रांतातील मनस्वी मुशाफिराला मुकलो’
पुणे : कविता आणि गीतलेखनाबरोबरच संगीत, रंगमंचीय कार्यक्रम, चित्रकला, कला प्रांतातील वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करणारे सुधीर मोघे यांच्या निधनाने मनस्वी कलाकाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी सुधीर मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सुधीर गाडगीळ – १९७८ ते १९८५ या कालावधीत दादर येथील अरुण काकतकर यांच्या मठीमध्ये उमेदवारी करणाऱ्या आम्हा युवकांची मैफल जमायची. तेथे सुधीरच्या कविता आम्ही पहिल्यांदा ऐकल्या. त्याचे शब्दांवरचे प्रेम जाणवले.
आनंद मोडक – सुधीर मोघे हा माझ्यासाठी मितवा म्हणजे मित्रापलीकडचा होता. शब्दांचा कंटाळा आल्यावर चित्रमाध्यमातून तो व्यक्त झाला. सहसा कवी हा केवळ आपल्याच कवितांवर प्रेम करतो. पण, असंख्य कवींच्या वेगवेगळ्या कविता मुखोद्गत असणारा सुधीर हा एकमेव कवी.
सलिल कुलकर्णी – मायेचा आणि विश्वासाचा हात काढून घेतला गेल्यामुळे पोरकेपणा आला असे वाटते. कविता आणि गाण्याकडे पाहण्याची नजर त्यांनी शिकविली.
प्रा. प्रकाश भोंडे –  ‘मराठी भावगीतांचा इतिहास’ लेखनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या काळातच मोघे आपल्यातून निघून जावेत हे आपले दुर्दैव.
संदीप खरे – कवी म्हणून कोणालाही माहीत नव्हतो तेव्हापासून मोघे यांनी माझी पाठराखण केली. तडजोड न करता जे पटेल तेच काम मनापासून करणारे मनस्वी, हरहुन्नरी आणि कलंदर व्यक्तिमत्त्व असेच मी त्यांचे वर्णन करेन.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Words carries luggage
First published on: 16-03-2014 at 05:45 IST