विरोध करणाऱ्या रहिवाशांविरोधात गुन्हे दाखल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : रखडलेल्या ना. म. जोशी मार्ग पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला अखेर बुधवारपासून सुरुवात झाली. येथील मोकळे ललित कला भवन मैदान पत्र्यांनी बंदिस्त करून एका इमारतीच्या बांधकामाला म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुरुवात केली. रहिवाशांचा होणारा विरोध लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात आले.  

 ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळींमधील काही पात्र रहिवासी इमारती रिकाम्या करत नसल्याने पुनर्विकासाचे काम रखडले होते. हे काम मार्गी लावण्यासाठी मुंबई मंडळाने कडक भूमिका घेतली आहे. त्यानुसार ६७ रहिवाशांवर निष्कासनच्या नोटिसा बाजवण्यात आल्या असून त्यांची सुनावणीही पूर्ण झाली आहे. या सुनावणीनंतरही स्थलांतरास विरोध करणाऱ्यांना दुसरी नोटीस बजावण्यात आली. या नोटिशीनुसार सात दिवसांत घर रिकामे केले नाही, तर पुढील कार्यवाही पूर्ण करून रहिवाशांविरोधात निष्कासनाची कारवाई करावी लागेल अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

इमारती रिकाम्या करण्यास विरोध होत आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात येथील तीन इमारती लवकरात लवकर रिकाम्या करून घेत कामास सुरुवात करण्याचा मुंबई मंडळाचा मानस आहे. या प्रक्रियेस वेळ लागत असल्याने मंडळाने येथील मोकळय़ा ललित कला भवन मैदानावर एका पुनर्वसन इमारतीच्या कमाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी मैदान पत्रे उभारून बंदिस्त करण्यात आले. यावेळी काही रहिवाशांनी कामाला विरोध केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत काही रहिवाशांना ताब्यात घेतले. तर १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लवकरच तीन इमारती पाडण्याचेही काम सुरू करण्यात  येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

येथील ललित कला भवन मैदानात आजपासून पुनर्वसित इमारतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता लवकरच तीन इमारती पाडून त्या जागीही इमारतींच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल. यासाठीची प्रक्रिया सुरू आहे, असे म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work begins on police escort bdd chawl redevelopment akp
First published on: 24-02-2022 at 00:09 IST