लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) वांद्रे – वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात सागरी सेतूच्या कामाने वेग घेतलेला नाही. परिणामी, पावणेचार वर्षांत या प्रकल्पाचे केवळ नऊ टक्केच काम पूर्ण झाले आहे. आता पावसळ्याचे किमान तीन महिने सागरी सेतूची समुद्रातील कामे पूर्णत: बंद करण्यात आली आहेत. त्याचाही परिणाम प्रकल्प पूर्णत्वावर होण्याची चिन्हे आहेत.

वांद्रे – वर्सोव्यादरम्यान वांद्रे – वरळी सागरी सेतूचा विस्तार करण्यात येत आहे. सुमारे १७.१७ किमी लांबीच्या आणि सात हजार कोटी रुपये खर्चाच्या या सागरी सेतूचे २०१९ पासून काम सुरू आहे. या प्रकल्पाचे काम सुरू होऊन आता पावणेचार वर्षे होत आली असून या कालावधीत बऱ्यापैकी काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाचे प्रत्यक्षात केवळ नऊ टक्के काम पूर्ण झाले आहे. या वृत्तास एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. आता पावसाळ्यात समुद्रात कोणत्याही प्रकारचे काम करता येणार नाही. त्यामुळे पुढील किमान तीन महिने समुद्रातील कामे पूर्णत: बंद ठेवण्यात येणार असून सप्टेंबरदरम्यान समुद्रातील कामास सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-वर्षअखेरीस ‘आपला दवाखान्यां’ची संख्या २५० वर, मुंबई महानगरपालिकेचा निर्धार

सागरी सेतूचे काम सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच करोनाचे संकट ओढावले. त्याचा फटका या प्रकल्पालाही बसला. मात्र करोनाचे सावट दूर झाल्यानंतरही या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतलेला नाही. उलटपक्षी ऑगस्ट २०२१ पासून प्रकल्पाचे काम पूर्णपणे बंद होते. आर्थिक अडचणीचे कारण पुढे करीत ‘वी बिल्ड अस्टाल्डी’ या कंत्राटदार कंपनीने कामच सुरू केले नाही. त्यावेळी प्रकल्पाचे केवळ दोन ते अडीच टक्के काम पूर्ण झाले होते. महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम ठप्प झाल्याने अखेर एमएसआरडीसीने कठोर पावले उचलत कंत्राटदाराविरोधात दंडात्मक कारवाई केली. या कारवाईनंतरही कंत्राटदार काम सुरू करीत नसल्याने अखेर एमएसआरडीसीने कंत्राट रद्द करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर मात्र कंत्राटदाराने जानेवारी २०२२ मध्ये रिलायन्स इन्फ्राशी असलेली भागिदारी संपुष्टात आणली आणि ‘अपको’ या नव्या भागीदाराची निवड करून कामाला सुरुवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वी बिल्ड अस्टाल्डी’ने नव्या भागिदाराच्या साथीने काम सुरू केले. त्यानंतर प्रकल्पाच्या कामाचा वेग काहीसा वाढण्याची शक्यता दिसत होती. परंतु पावसाळा जवळ आल्यामुळे पुन्हा एकदा कामाचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत. किंबहुना पावसाळ्यात समुद्रातील कामे बंद ठेवण्यात येणार आहेत. पावसाळ्यानंतरच या प्रकल्पाचे काम वेगात सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२६ पर्यंत मुंबईकरांना वाट पाहावी लागणार आहे.