मुंबई : भाऊचा धक्का येथील मॅलेट बंदरातील जहाजांची कोंडी सोडविण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेल्या मच्छिमार जेट्टीच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम दोन वर्षांत अर्थात २०२५ अखेरीस पूर्ण करण्याचे बंदर प्राधिकरणाचे नियोजन आहे.

आजच्या घडीला मॅलेट बंदरातील जेट्टींवर केवळ ५० बोटी उभ्या राहतात. पण हे काम पूर्ण झाल्यास अर्थात २०२५ अखेरपासून येथे १५० बोटी उभ्या राहू शकणार आहेत. दक्षिण मुंबईतील भाऊचा धक्का येथील मॅलेट बंदरवर प्रवाशी जेट्टी आणि मच्छिमारांसाठीची जेट्टी अशा दोन जेट्टी आहेत. मात्र या दोन्ही जेट्टींकडे जाण्यासाठी एकच रस्ता आहे. त्यामुळे या जेट्टीवर आणि रस्त्यावर मोठी कोंडी होते. त्यात या बंदरावरील जहाजांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला १३०० ते १४०० जहाज येथे येतात. मात्र सध्या जेट्टीची बोटी उभ्या करण्याची क्षमता केवळ ५० बोटी अशी आहे. परिणामी उर्वरित बोटींना मोठी प्रतीक्षा करावी लागते. मासे हे नाशवंत असताना अनेक बोटींना मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने मासे खराब होत असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबी लक्षात घेत बंदर प्राधिकरणाने मॅलेट बंदरावरील मच्छिमारांसाठीच्या जेट्टीच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. तर प्रवाशी जेट्टी आणि मच्छिमारांसाठीच्या जेट्टीकडे जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता बांधण्याचाही निर्णय या विस्तारीकरणाअंतर्गत घेतला आहे. अशा या विस्तारीकरणाच्या कामासाठी मागील वर्षी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार निविदा अंतिम करत नुकतीच या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेसाठी कंत्राटी भरती

हेही वाचा – प्राणवायू निर्मिती प्रकल्प गैरव्यवहार प्रकरण : हायवे कन्स्ट्रक्शनचे रोमिन छेडा यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेट्टी विस्तारीकरणासह इतर कामांसाठी १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी केंद्राकडून उपलब्ध करुन दिला जात आहे. नोव्हेबरच्या सुरुवातीला या कामास सुरुवात झाली असून कामाला वेग देत दोन वर्षांत अर्थात २०२५ अखेरीस पूर्ण होईल असेही जलोटा यांनी सांगितले. जेट्टीचे विस्तारीकरणाचे हे काम पूर्ण झाल्यानंतर भाऊचा धक्का, मॅलेट बंदर येथील जहाजांची कोंडी दूर होणार आहे. तर सध्याची जेट्टीवरील बोटी लावण्याची क्षमता ५० बोटीवरून १५० बोटी अशी होणार आहे. दरम्यान मच्छिमारांच्या जेट्टीची वार्षिक उलाढाल अंदाजे १५०० कोटी रुपये अशी आहे. या वार्षिक उलाढालीतही वाढ होण्याची अपेक्षा यनिमित्ताने व्यक्त केली जात आहे.