आढावा बैठकीतून स्पष्ट

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपुलाच्या मुख्य मार्गिकांच्या निर्माणासंदर्भातील आढावा बैठक ठाणे पालिकेच्या यूआरसीटी केंद्रात आयोजित करण्यात आली होती. सेवा रस्त्यांची डागडुजी तसेच काही उपाययोजना केल्यानंतरच मुख्य मार्गिकांचे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी आठवडा लागणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे दिवाळीनंतरच कोपरी पुलाच्या मुख्य मार्गिकेचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपुलावरून दिवसाला हजारो वाहने मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतूक करतात. मात्र हा पूल अरुंद असल्याने त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होतो. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे एमएमआरडीए आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पुलाच्या दोन नव्या मार्गिका बांधून पूर्ण झाल्या असून या नव्या मार्गिकांवरून वाहतूक सुरू झाली आहे. प्रशासनाकडून आता मुख्य मार्गिकांच्या निर्माणाचे काम हाती घेतले जाणार आहे. मुख्य मार्गिका   बंद झाल्यास सकाळी आणि रात्रीच्या वेळी या भागात वाहतूक कोंडी    होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक सेवा रस्ते मार्गे वळविण्याचा विचार वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. मात्र सेवा रस्त्यावर काही    प्रमाणात    खड्डे पडले आहेत. तसेच येथील     दुभाजक बसविण्याचे काम अद्याप    शिल्लक आहे.

या संदर्भातील आढावा बैठक ठाणे महापालिकेच्या यूआरसीटी केंद्रात झाली. या वेळी महापालिका आयु्क्त डॉ. विपिन शर्मा, वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. कोपरी पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी तुळजाभवानी मंदिर येथील सेवा रस्ता दुरुस्तीची विनंती वाहतूक शाखेने ठाणे महापालिकेला केली. त्यानुसार येत्या आठवड्याभरात सेवा रस्त्याची दुरुस्ती केली जाईल. असे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले. एमएमआरडीएनेही सेवा रस्ता आणि पदपथाच्या मध्ये असलेल्या भागात काँक्रीटीकरण सुरू केले आहे. हे काम पूर्ण होण्यास पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता आहे. येथील सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक शाखा एमएमआरडीएला मुख्य रस्त्याचे काम करण्यास परवानगी देणार आहे.