मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथील धक्क्यावरील (जेट्टी) जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने रेडीओ क्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्का बांधण्याच्या निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाला डिसेंबर २०२४ पासून सुरुवात झाली आहे. आता या प्रकल्पाविरोधातील जनहित याचिका आधी उच्च न्यायालयाने आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने फोटाळून लावली असून या धक्क्याच्या समुद्रातील कामे करण्यास १५ सप्टेंबरनंतर परवानगी मिळणार आहे.

त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यात आला असून १५ दिवसांत धक्क्याच्या प्रत्यक्ष कामाला, पायाच्या खोदकामाला सागरी मंडळाकडून सुरुवात करण्यात येणार आहे. तर २०२८ पर्यंत नवीन धक्का कार्यान्वित करण्याचे सागरी मंडळाचे नियोजन आहे. हा धक्का कार्यान्वित झाल्यास गेट वे ऑफ इंडियावरील जलवाहतुकीचा ताण कमी होणार आहे. तर प्रवाशांना नवीन धक्क्यावर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होतील.

मांडवा, एलिफंटा, जेएनपीएला जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथील धक्क्यावरून प्रवासी बोटी सुटतात. मागील काही वर्षांपासून जलवाहतुकीला प्रतिसाद वाढत असून गेट वे ऑफ इंडिया येथील धक्क्यावरील प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे दोनच घक्के असल्याने एका वेळी तेथे अधिक बोटी उभ्या करता येत नाहीत. परिणामी, या धक्क्यावरील ताण वाढत आहे. तर महत्त्वाचे म्हणजे भविष्यात येथील प्रवासी संख्येत १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

ही बाब लक्षात घेऊन सागरी मंडळाने रेडिओ क्लब येथे नवीन अत्याधुनिक धक्का बांधण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी निविदा अंतिम करून प्रकल्पाचे डिसेंबर २०२४ मध्ये भूमिपूजन करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकल्पाला आक्षेप घेत याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. नवीन धक्क्यामुळे वाहतूक कोंडी वाढेल, पर्यावरणास धोका निर्माण होईल, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नुकताच या प्रकल्पाला हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे आता प्रकल्पाच्या कामास वेग येणार आहे.

प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्याने आता १५ दिवसांत धक्क्याच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कास्टींग यार्डमधील डिसेंबर २०२४ पासून कामे सुरू होती. पण आता १५ दिवसात समुद्रातील बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

कामाला वेग देऊन ३० महिन्यांत म्हणजेच २०२८ पर्यंत नवीन धक्का प्रवाशांसाठी खुला करण्याचे सागरी मंडळाचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर रेडिओ क्लब येथे एकूण १० धक्के असणार असून येथे एका वेळी २० बोटी उभ्या करता येणार आहेत. तर वाहनतळ, स्वच्छतागृह, उपहारगृह यासह अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधा येथे उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे जलमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा धक्का सुरू झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

असा आहे प्रकल्प

रेडिओ क्लब येथे २५११६.२८ चौरस मीटर जागेवर नवीन धक्क्याचे बांधकाम करण्यात येत आहे. येथे एकूण १० धक्के असणार असून या ठिकाणी एका वेळी २० बोटी उभ्या करता येणार आहेत. प्रवासी निवारा, वाहनतळासह अनेक सुविधा येथे उपलब्ध असतील. प्रत्येक धक्का ५५० मीटर लांबीचा असणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १८० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प सागरमाला प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आला असून या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाच्या कामाला डिसेंबर २०२४ मध्ये सुरुवात झाली असून हे काम २०२८ पर्यंत पूर्ण करून प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.