मुंबई : घाटकोपर येथील नारायण नगरातील गोंदीया हॉल व गौसीया मशिदीजवळील एका घराच्या दुरुस्तीचे काम बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास सुरू होते. त्याच वेळी अचानक घराची भिंत कोसळली. त्या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला. जावेद खान (४५) असे मृत कामगाराचे नाव आहे.
गौसीया मशिदीजवळ एका घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. कामगार बुधवारी सकाळी कामावर गेले असताना अचानक भिंतीचा काही भाग कोसळला. कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली कामगार जावेद अजीज खान अडकला. नागरिकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच, या दुर्घटनेबाबत त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यांनतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अग्निशामकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला बाहेर काढून उपचारासाठी नजिकच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, बुधवारी घराचा भाग / भिंत पडण्याच्या तीन घटना घडल्या. तसेच, शॉर्ट सर्किट व झाडे, फांद्या पडल्याच्या एकूण १२ घटना घडल्या. शहरात २ व पूर्व उपनगरात १ अशा एकूण ३ ठिकाणी घराचा भाग / भिंत पडण्याच्या दुर्घटना घडल्या होत्या. त्यात घाटकोपरच्या दुर्घटनेचाही समावेश होता. दरम्यान, शहरात ३ व पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण ८ ठिकाणी शॉर्ट सर्किट होण्याच्या घटना घडल्या. तसेच, शहरात २, पूर्व उपनगरात १ व पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ४ ठिकाणी झाडे, फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. तक्रारींची पडताळणी करून संबंधित विभागामार्फत फांद्या तोडण्याचे व उचलण्याचे काम करण्यात आले.