१३ राष्ट्रांतील बौद्ध भिक्खू उपस्थित राहणार
बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ ते २४ नोव्हेंबर असे तीन दिवास औरंगाबाद येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला १३ राष्ट्रांमधील बौद्ध भिक्खू उपस्थि राहणार आहेत. तीन दिवसांच्या या परिषदेत बौद्ध धम्माशी संबंधित विविध विषयांवर प्रकाश टाकणारे परिसंवाद होणार आहेत.
औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरात ही परिषद होणार आहे. बौद्ध उपासिका रोजना व्हॅनीच कांबळे व सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या पुढाकारातून, ही परिषद होत असून, या निमित्त जगभरातील बौद्ध भिक्खू पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत.
या परिषदेतील प्रमुख उपस्थिती ही बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांची असणार आहे. त्याचबरोबर श्रीलंकेतील गुणरत्न महानायक भन्ते डॉ. वाराकागोडा महाथेरो यांच्यासह नेपाळ, कंबोडिया, जपान, व्हिएतनाम, म्यानमानर, थायलंड इत्यादी १३ देशातून अनेक मान्यवर बौद्ध भिख्खू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत सदानंद महास्थवीर यांनी दिली.
अजिंठा महामार्गावर थायलंड येथील धम्मउपासिका रोजना व्हॅनीच व डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या दानातून निर्माण करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या लोकुत्तरा भिख्खू प्रशिक्षण केंद्राला दलाई लामा व सर्व भिक्खूगण भेट देणार आहेत. २४ नोव्हेंबरला सकाळी १० ते ११.३० या दरम्यान दलाई लामा यांचे बुद्धांनी दिलेल्या प्रेम, शांती, प्रज्ञा, शील, करुणा, अहिंसा, सामाजिक बंधुभाव या सर्वोच्च जीवनमूल्यांवर आधारित प्रवचन होणार आहे.
