मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी बीडीडी चाळ प्रकल्पातील वरळी येथील पुनर्वसनातील सदनिकांना विलंब झाल्याने मुंबई गृहनिर्माण मंडळाने कंत्राटदार मे. टीसीसी कन्स्ट्रक्शन कंपनीवर १३ कोटी दंडाची नोटीस बजावली आहे. या जुलैअखेरपर्यंत ५५६ सदनिकांचा ताबा रहिवाशांना दिला जाणार होता. परंतु पुनर्वसनाच्या इमारतींना दोन ते ११ महिने विलंब झाल्याने म्हाडाने ही कारवाई केली.

पहिल्यांदाच दंड

वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पांसाठी अनुक्रमे टीसीसी कन्स्ट्रक्शन प्रा. लि., शापुरजी पालनजी आणि लार्सन ॲंड टुब्रो या बांधकाम क्षेत्रातील बड्या कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. यापैकी वरळी प्रकल्पात जुलैअखेरपर्यंत ५५६ सदनिकांचा ताबा देण्याचा म्हाडाचा प्रयत्न होता. परंतु कंत्राटदाराने ठरलेल्या वेळापत्रकानुसार तयार सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा देण्यास विलंब लावल्याने म्हाडाला वेळ पाळता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर म्हाडाचे वरळी प्रकल्पातील कंत्राटदार मे. टीसीसी कन्स्ट्रक्शन कंपनीवर विलंबाबद्दल नोटीस बजावली आहे. विलंबाबद्दल व खर्चात झालेल्या वाढीबद्दल १३ कोटींचा दंड का आकारू नये, यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

सात दिवसांत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा हा रक्कम भविष्यात सदर कंपनीला द्यावयाच्या देयकातून वळती केली जाणार आहे. यासंदर्भात म्हाडाने नियुक्त केलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने ही नोटीस बजावली आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच कंत्राटदाराला दंड करण्यात आला आहे. या नोटिशीबाबत मे. टीसीसी कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रकल्प संचालक प्रकाश पाटील यांचा संपर्क होऊ शकला नाही. लघुसंदेशालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कॅपिसेट कन्स्ट्रक्शन कंपनीचे तुषार श्रीवास्तव यांनी अशी नोटीस मिळाल्याचे मान्य करीत नोटिशीला उत्तर दिले जाईल, असे सांगितले.

चार हजार सदनिकांचा ताबा?

वरळी प्रकल्पात एकूण १२१ चाळींतील नऊ हजार ६८९ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी ३४ इमारती (४० मजली) बांधल्या जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पुनर्वसनाच्या एक क्रमांकाच्या (डी आणि ई) इमारतीतील सदनिकांचा ताबा मेअखेरपर्यंत मिळणार होता. मात्र त्यास दोन महिने विलंब झाला आहे, असे या नोटिशीत म्हटले आहे. याच इमारतीतील १६९० सदनिकांचा ताबा डिसेंबरअखेर तर सहा क्रमांकाच्या इमारतीतील १६४२ सदनिकांचा ताबा ॲागस्ट २०२७ मध्ये दिला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ना. म. जोशी मार्ग प्रकल्पात ३२ चाळींतील दोन हजार ५६० तर नायगाव प्रकल्पात ४२ चाळींतील तीन हजार ३४४ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात डिसेंबरअखेरपर्यंत ना. म. जोशी मार्ग प्रकल्पातील १४०१ तर नायगाव प्रकल्पातील ३४२ रहिवाशांना सदनिकांचा ताबा दिला जाणार आहे .
डिसेंबरअखेरीस चार हजार रहिवाशांना सदनिकेचा ताबा देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या सादरीकरणानुसार सदनिकांच्या ताब्याची स्थिती :

  • वरळी : डिसेंबरअखेर – २२४६ (जुलै – ५५६, सप्टेंबर – १४१९, डिसेंबर – २७१)
  • नायगाव : डिसेंबरअखेर – १४०१( सप्टेंबर -८६४, डिसेंबर -५३७)
  • ना. म. जोशी मार्ग : डिसेंबरअखेर – ३४२.