अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला ठरलेल्या कल्पना चावला यांचा आज जन्मदिवस आहे. जिद्द आणि चिकाटीला मेहनतीची जोड दिल्यास काय घडू शकते, याचा प्रत्यय कल्पना चावला यांनी दिला. १ फेब्रुवारी २००३ रोजी कल्पना चावला यांचा अवकाश मोहिमेदरम्यान झालेल्या अपघाता मृत्यू झाला. आपल्या कर्तृत्वाने भारतीयांची मान जगभरात उंचावणाऱ्या कल्पना चावला यांचा आज ५५ वाढदिवस आहे. १७ मार्च १९६२ रोजी हरयाणातील कर्नालमध्ये कल्पना यांचा जन्म झाला. त्यामुळे देशासह जगभरात आज कल्पना चावला यांच्या कार्याला मानवंदना दिली जाते आहे. मात्र महाराष्ट्र सरकारच्या मराठी विश्वकोशात कल्पना चावला यांची जन्मतारीखच चुकीची देण्यात आली आहे.

हरयाणात जन्मलेल्या आणि लहानपणापासून अवकाश भरारीची स्वप्ने पाहणाऱ्या कल्पना चावला यांनी जिद्दीच्या जोरावर त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. १७ मार्च १९६२ रोजी कल्पना चावला यांचा जन्म झाला. मात्र राज्य सरकारच्या मराठी विश्वकोशात कल्पना चावला यांची जन्मतारीख चुकीची दाखवण्यात आली आहे. मराठी विश्वकोशात कल्पना चावला यांची जन्मतारीख १ जुलै असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर कल्पना चावला यांचे जन्मवर्षाची माहितीदेखील चुकीची माहिती देण्यात आली आहे. कल्पना चावला यांचा जन्म १९६१ मध्ये झाल्याची माहिती मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. प्रत्यक्षात कल्पना चावला यांचा जन्म १९६२ मध्ये झाला होता. मराठी विश्वकोशाच्या या अज्ञानामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

हरयाणातील जन्मलेल्या कल्पना चावला चार भावंडांमध्ये सर्वात लहान होत्या. त्यांना घरात लाडाने मोंटू म्हटले जायचे. कल्पनाने डॉक्टर व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. मात्र कल्पना यांना लहानपणापासूनच अवकाशात झेप घ्यायची होती. कल्पना रतन टाटांना आदर्श मानायच्या. अंतराळातील पहिल्या यात्रेदरम्यान त्यांनी अंतराळात ३७२ तास पूर्ण केले आणि पृथ्वीला २५२ प्रदक्षिणा घातल्या. कल्पना यांनी १९८२ मध्ये चंदिगड ऍरॉनॉटिकल इंजिनियरिंग कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. १९८४ मध्ये टेक्सासच्या ऍरोस्पेसमधून पदवी मिळवली. १९८८ पासून कल्पना चावला नासामध्ये कार्यरत होत्या.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने याबाबत खुलासा करताना म्हटले आहे की, एन्साक्लोपिडीया ऑफ ब्रिटानिकाच्या वेब आवृत्तीमधील नोंदीनुसार कल्पना चावला यांची जन्मतारीख १ जुलै १९६१ अशी असून तशीच ती विश्वकोशात दिली आहे. तसेच नासा, आयलव्ह इंडिया, स्पेस डॉट कॉम यांसारख्या अनेक संकेतस्खळावरही हीच जन्मतारीख व हेच जन्मवर्ष दिले आहे. १७ मार्च १९६२ ही जन्मतारीख असतानाही शाळेत प्रवेश करण्यासाठी कल्पना चावला यांच्या पालकांनी १ जुलै १९६१ ही जन्मतारीख नोंदवली आहे असा उल्लेख काही संदर्भात आढळून येतो.