पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आलेले देशोदेशींचे चित्रपट मुंबईकरांनाही पाहायला मिळावेत या हेतूने सुरू करण्यात आलेल्या तिसऱ्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर महोत्सवाचे प्रमुख व ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, प्रतिष्ठानचे विश्वस्त व सचिव शरद काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि भारतीय सिनेमाचे शताब्दी वर्ष यानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार केल्यानंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, सुलोचनादीदी या दिग्गज अभिनेत्री तर आहेतच. परंतु, सामाजिक जाणीव असलेल्या त्या संवेदनाशील कलावंत आहेत. गेल्या सहा दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या अनेक पिढय़ांना त्यांनी रिझविले आहे. भारत-चीन युद्ध असो की भारत-पाकिस्तान यांच्यात झालेले युद्ध असो त्यानंतरच्या काळात जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन विचारपूस करून सामाजिक जाणीवेचे भान सुलोचनादीदींनी दाखवून दिले, असेही शरद पवार यांनी सांगितले.
यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात सुरुवातीला नृत्यांगना संध्या पुरेचा यांनी कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. महोत्सवाचे प्रमुख डॉ. जब्बार पटेल यांनी महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांची माहिती दिली. समारंभानंतर पोलंडचे दिग्दर्शक स्माझरेव्हस्की यांचा ‘रोझ’ हा चित्रपट दाखविण्यात आला. २६ जानेवारीपर्यंत या महोत्सवातील चित्रपट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संकुलातील मुख्य सभागृह, रंगस्वर आणि सांस्कृतिक सभागृह अशा तीन चित्रपटगृहांमध्ये दाखविण्यात येणार असून प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. हंगेरी या देशांतील चित्रपटांचा विशेष विभाग, मराठी चित्रपट तसेच जगभरातील विविध २०० चित्रपट यात पाहायला मिळणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2013 रोजी प्रकाशित
यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आलेले देशोदेशींचे चित्रपट मुंबईकरांनाही पाहायला मिळावेत या हेतूने सुरू करण्यात आलेल्या तिसऱ्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात करण्यात आले.
First published on: 20-01-2013 at 04:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashwant international movie festival started