मुंबई : नवी मुंबईतील तरूण योगेश अलेकरी याने ५० पेक्षा जास्त देशांना भेटी देण्याची मोहीम आखली असून दुचाकीने ६० हजारांपेक्षा अधिक किमीचा प्रवास तो करणार आहे. गेल्या २० दिवसात त्याचा मुंबई ते चीन पर्यंतचा प्रवास झाला आहे. हा प्रवास नाशिक, इंदोर, अयोध्या, काठमांडू, एव्हरेस्ट बेस कॅम्प तिबेट भागातून केला. ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे मानस योगेशचे आहे.

या प्रवासादरम्यान योगेश नेपाळमार्गे हिमालय पर्वत रांगा पार करून तिबेटमध्ये प्रवेश केला आहे. ऐतिहासिक सिल्क रुट (रेशीम मार्ग) या मार्गावरून मार्गक्रमण करत पुढे जगातील सर्वात मोठा बौद्ध मठ असलेल्या ल्हासा शहरात काही दिवस थांबून, पुढे खार्गोस, अल्माती करत पामिर पर्वत रांगेत जाणार आहे. हा मार्ग पार करून सिल्क रूटवरील महत्वाचे शहरे ताश्कंद, समरकंद, बुखारा येथील ऐतिहासिक वास्तू आणि मध्ययुगीन इतिहासाच्या पाऊलखुणा चा मागोवा घेत योगेश पुढे अरल समुद्राकडे जाणार आहे. अरल समुद्रात ३० वर्षांपूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी आणि जलवाहतूक होत असलेला हा सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला समुद्र आता जवळपास ७० टक्के आटला आहे. तेथे एक वाळवंट तयार झाले आहे. वाळवंटातून उडणाऱ्या धुळीच्या वादळाने जवळील गावाचे, शहराचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे जागतिक पटलावर चर्चेत असलेल्या ठिकाणी जाणार आहे, असे योगेश याने सांगितले.

त्यानंतर रशियाची राजधानी मॉस्को येथे पुढील दोन महिन्यांनी पोहचणार आहे.मॉस्कोच्या ग्रँड डचीमधील ट्व्हर या शहरात जाणार आहे. वास्को द गामाच्या आगमनाच्या खूप आधी म्हणजे १५ व्या शतकात भारतात रशियन व्यापारी अफानासी निकितिन आला होता.अफानासी निकितिनचे ट्व्हर हे जन्म स्थळ असल्याने, या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या जन्मगावी भेट देऊन पुढे युरोप आणि जिब्रलतर ची खाडी पार करून आफ्रिके कडे प्रवास चालू राहणार आहे. सध्या योगेश चीनमध्ये असून सिल्क रूट या ऐतिहासिक व्यापारी मार्गावर प्रवास करत आहे. आतापर्यंत ६,५०० किमीचे अंतर कापून झाले असून ४५ ते ५० हजार रुपये पेट्रोलचा खर्च झाला आहे. लवकरच कझाकस्तानमध्ये प्रवेश करणार आहे. संपूर्ण प्रवास एकंदरीत २२० ते २४० दिवसांचा असेल.

जगाचे छत मानले जाणाऱ्या तिबेटीयन पठारावर उणे १० अंश तापमनात दुचाकी चालवणे आव्हानात्मक होते. चीनमध्ये प्रवेश केल्यावर त्वरीत चीनमधील वाहन परवाना घ्यावा लागला. तसेच दुचाकीची नोंदणी करून नवीन वाहन पाटी घ्यावी लागली. चीनमध्ये स्वतःच्या मर्जीने दुचाकी चालवू शकत नाही. मोठी रक्कम मोजून चीनमधील एक मार्गदर्शक घ्यावा लागतो. तो प्रत्येक ठिकाणी सोबत राहून सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असतो. तसेच येथे समाज माध्यमे वापरण्याला बंदी असल्याने व्हीपीएन घेऊन समाज माध्यमांचा वापर करावा लागतो. आता चीनच्या उत्तर भागात डुन हुआंग या वाळवंटी प्रदेशात पोहचलो असून सिल्क रूट या मार्गावरून प्रवास सुरू आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाळूच्या वादळाचा सामना करावा लागत आहे, असे योगेशने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योगेश याने यापूर्वी एकट्याने दुचाकीवरून मुंबई-लंडन-मुंबई असा प्रवास केला आहे. त्याने १३६ दिवसांत एकट्याने दुचाकी चालवून लंडन आणि तेथून परतीचा प्रवास केला. त्यावेळी योगेशने आशिया आणि युरोप या खंडातील २७ देशांतून प्रवास करून विक्रम केला होता.