मुंबई: ‘दोन पाने वाचून दोनशे पन्नास पानांच्या पुस्तकात नेमके काय लिहिले आहे, हे कसे कळणार? त्यामुळे ‘ट्रेलर’ पाहून चित्रपटाचा अंदाज बांधता येत नाही. ‘ट्रोलर्स’ नावाची एक जमात आहे आणि ही जमातच फक्त टीका करते. कोणताही चांगला माणूस काहीही माहिती नसताना कधीही कोणाला शिव्या देत नाही आणि या माणसांकडे स्वतःची विविध कामे सोडून टीका करायला वेळही नसतो. काही माणसे कोणताही संबंध नसताना सतत थुंकत असतात, एका जागी बसून थुंकतात आणि उठूनही जात नाहीत, एका जागी बसूनच पिचकारी मारण्याचे काम करतात. त्याप्रमाणे ‘ट्रोलर’ ही जमात सुद्धा काहीही माहिती नसताना सतत थुंकत राहते’, असे स्पष्टपणे प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मैत्री, आत्मशोध आणि निसर्गाच्या कुशीत घडणाऱ्या प्रवासाची कहाणी सांगणारा ‘बंजारा’ हा मराठी चित्रपट १६ मेपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह शरद पोंक्षे याने केले आहे. रोहिणी विजयसिंह पटवर्धन आणि शरद पोंक्षे यांनी निर्माते म्हणून धुरा सांभाळली आहे. तर प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकत आहेत.
‘बंजारा’ चित्रपटाच्या निमित्ताने स्नेह पोंक्षे, शरद पोंक्षे, सुनील बर्वे आणि भरत जाधव यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत मनमोकळा संवाद साधला. यावेळी शरद पोंक्षे यांनी स्वतःवर आणि प्रदर्शनापूर्वी विविध चित्रपटांवर होणाऱ्या टीकेवर बोलताना ‘ट्रोलर्स’ना चांगलेच खडसावले. यावेळी एक उदाहरण देताना शरद पोंक्षे म्हणाले की, मराठीतील सर्वात ब्लॉकबस्टर चित्रपट असणाऱ्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाबाबत सर्वात वाईट लिहिले गेले, मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ट्रोलिंगचा काही परिणाम नाही, ट्रोलर्सनी काहीही बडबडुदे त्यांना सतत थुंकायची सवय लागलेली आहे. ट्रोलर्सना कोण विचारते आहे? मी त्यांच्याकडे लक्षही देत नाही. आम्ही आमचे चांगले काम करीत राहणार.
दरम्यान, शरद पोंक्षे यांनी समाजमाध्यमांवर मुलीचा उल्लेख करीत होणाऱ्या टीकेवरही भाष्य केले. ‘शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेह पोंक्षे हा ‘बंजारा’ चित्रपट दिग्दर्शित करतो आहे आणि या चित्रपटात स्वतः शरद पोंक्षे काम करीत आहेत’ या पोस्टच्या खाली ‘तू तुझ्या मुलीला अमेरिकेला पाठव आणि बहुजनांना रस्त्यावर उतरव’ अशी कमेंट होती. या कमेंटचा आणि ‘बंजारा’ चित्रपटाचा काय संबंध? माझ्या मुलीचा काय संबंध? तुम्ही चित्रपटाबद्दल बोला. त्यामुळे ‘ट्रोलर’ ही एक जमात आहे आणि त्यांना कोणाशीही कसलेही देणेघेणे नाही. मी ट्रोलर्सला महत्वच देत नाही, शून्यापेक्षाही कमी महत्व देतो आणि त्यामुळे काहीही फरक पडत नाही. मला अनेक वर्ष ट्रोल केले जात आहे, मात्र शरद पोंक्षे काही थांबत नाही आणि त्याला थांबविण्याची कोणाची हिंमतही नाही, असे म्हणत शरद पोंक्षे यांनी ट्रोलर्सला खडे बोल सुनावले.