लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या २९ वर्षीय तरूणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार गुरूवारी रात्री बोरिवली परिसरात घडला. याप्रकरणी २७ वर्षीय तरूणाला बोरिवली पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मल्लेश नरसय्या गतप्पा (२९) असे जखमी तरूणाचा नाव असून तो गोराई येथील भीमनगर परिसरातील रहिवासी आहे. मल्लेश मित्र रोहित सावंत व आकाश कांबळेसोबत लोटस इमारतीच्या आवारात होळी साजरी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे आरोपी आकाश शिंदेही आला होता. होळीची पूजा सुरू असताना मल्लेश मित्रांशी गप्पा मारत उभा होता. दीड वर्षापूर्वी शिंदेचे तक्रारदार मल्लेशसोबत भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून त्याने मल्लेशसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. संतप्त झालेल्या शिंदेने कोयत्याने मल्लेशवर हल्ला केला. आरोपी शिंदेने मल्लेशच्या मानेवर, गालावर व कपाळावर कोयता मारला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मल्लेशला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यामुळे मल्लेशच्या मानेवर, डाव्या कानावर व कपाळावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा व हत्यार बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बोरिवली पोलिसांनी तपास पथक तयार करून आरोपीला राहत्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली. हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. तो तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.

आरोपी आकाश शिंदे हा हाऊसकिपिंगची कामे करतो. तो पालघर जिल्ह्यातील नायगाव येथील गणेश नगर परिसरात राहतो. मल्लेश व शिंदे दोघेही पूर्वी चांगले मित्र होते. पण दीड वर्षांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. आरोपीविरोधात यापूर्वीही काही गुन्हे दाखल असून त्याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तेथे सीसी टीव्ही कॅमेरेच नव्हते. याप्रकरणी पोलिसांनी दोन प्रत्यक्षर्शींचा जबाब नोंदवला आहे. शिंदे हा मल्लेशला मारण्याच्या हेतूनेच तेथे आला होता. त्यामुळे तो सोबत कोयता घेऊन आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी बोरिवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.