मुंबई : ‘सुरक्षित प्रवास व रस्ता सुरक्षा’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या दोन संदेशाचा जगभरात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नवी मुंबईतील रहिवासी योगेश अलेकरी यांनी मुंबई – लंडनदरम्यानचा २५ हजार किमी प्रवासाला सुरुवात केली आहे. राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई सेंट्रल येथे योगेशच्या दुचाकीला झेंडा दाखविला आणि योगेशचा प्रवास सुरू झाला.

मुंबई – लंडनदरम्यानच्या प्रवासात  योगेश २४ देशांना भेट देणार असून तो हा प्रवास १२० दिवसांमध्ये पूर्ण करणार आहे. तसेच पाकिस्तान, चीन आणि म्यानमारच्या सीमा बंद असल्याने योगेश लंडनच्या दिशेने प्रवास सुरू करण्यापूर्वी त्याची दुचाकी इराणला एअरलिफ्ट करेल. लंडनला पोहोचल्यानंतर तो पुन्हा दुचाकीवरून इराणपर्यंत परतीचा प्रवास करणार आहे. त्यानंतर इराणहून नवी दिल्लीला एअरलिफ्ट करेल. या संपूर्ण प्रवासासाठी योगेशने वैयक्तिकरित्या २५ लाख रुपयांची व्यवस्था केली आहे. दरम्यान, या मोहिमेद्वारे ‘रस्ते सुरक्षितता’ आणि ‘जबाबदार नागरिक’ आदी संदेशांचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचे योगेशने सांगितले.