मुंबई: शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यानंतर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून विक्रोळीत वास्तव्यास असलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाला दोघांनी पावणेचार लाख रुपयांचा गंडा घातला. याबाबत तरुणाने पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
विक्रोळी परिसरात वास्तव्यास असलेला सफिन कुरेशी (२१) अभियंता आहे. काही दिवसांपूर्वी एका इसमाने त्याला मोबाइलवर संदेश पाठवला होता. आपण शेअर बाजारात काम करीत असल्याचे त्याने संदेशात म्हटले होते. त्याच्याकडे असलेल्या ॲपच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे अमिष आरोपीने सफिनला दाखवले. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या सफिनने त्याच्यावर विश्वास ठेवून तत्काळ होकार दिला. त्यानंतर काही वेळातच त्याला एका महिलेने फोन करून गुंतवणुकीसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यास सांगितली.
याचदरम्यान तरुणाने या महिलेच्या सांगण्यावरून विविध शेअर खरेदी करण्यासाठी एकूण पावणेचार लाख रुपये भरले. मात्र काही दिवसानंतर एका व्हाट्स ॲप ग्रुपवर आलेल्या संदेशात सदर ॲपमध्ये पैसे गुंतवणूक केल्याने फसवणूक झाल्याचा संदेश आला होता. त्यामुळे सफिनला संशय आल्याने त्याने तत्काळ पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पैसे काढता येत नव्हते. त्यामुळे त्याने तत्काळ संबंधित महिलेशी संपर्क केला. मात्र तिचा फोन बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे सफिनच्या लक्षात आले. त्याने तात्काळ पार्कसाईट पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.