कांदिवली येथील गणपती विसर्जन मिरवणुकीत नृत्य करणाऱ्या तरुणाला ह्दय विकाराचा झटका आला. बेशुद्ध पडलेल्या या तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अरुण सिंग (३६) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : राज्यात वाहनचालकांकडून सीटबेल्टच्या नियमाला हरताळ ; तीन वर्षांत २५ लाख प्रकरणांची नोंद

तब्बल दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी जल्लोषात विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या गजरात थिरकणारे भाविक गणेशमूर्तीसह विसर्जनस्थळी मार्गस्थ होत होते. कांदिवली पूर्वे येथील समता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता सुरू झाली. या मिरवणुकीत समता नगरमधील रहिवासी अरुण सिंग सहभागी झाला होता. रात्री दहाच्या सुमारास अरुणला अचानकपणे दम लागला. त्यामुळे तो घरी जाण्यास निघाला होता. मात्र, त्याला त्याच्या मित्रांनी आणि गणेश मंडळातील सदस्यांनी तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अरुणच्या मृत्यूची वार्ता परिसरात पसरली आणि सर्वत्र शोककळा पसरली.