एक १४ वर्षीय मूकबधिर मुलगी शारीरिक अत्याचाराची शिकार ठरली व त्यातून ती गरोदर राहिली. हे प्रकरण पोलिसांकडे आले तेव्हा आरोपीची माहिती मिळणे तर दूरच; प्रत्यक्ष घटनेबाबतही तपशील मिळणे कठीण होते. पण पोलिसांनी या पीडितेला सावज बनवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या.

डिसेंबर २०१६ मधील ही घटना आहे. बोरिवलीत राहणाऱ्या एका १४ वर्षे वयाच्या मुकबधिर मुलीच्या अचानक पोटात दुखू लागल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी डॉक्टरांकडे नेले. हे नेहमीचे पोटाचे दुखणे नाही, याची डॉक्टरांना खात्री पटली. ही मुलगी साडेचार महिन्यांची गरोदर असावी, असा डॉक्टरांचा दावा होता. चाचण्यांनंतर तो खरा ठरला. ही बाब डॉक्टरांनी आई-वडिलांना सांगितली तेव्हा त्यांच्यावर आभाळ कोसळले. काय करावे ते सुचेना. १४ वर्षे वयाच्या मुकबधिर मुलीच्या पोटात गर्भ वाढू देण्यातही काहीही अर्थ नव्हता. गर्भपात हा एकच पर्याय होता. परंतु ही ‘मेडिको-लीगल’ प्रकरण असल्यामुळे पोलिसांना कळविण्यात आले. बोरिवली पोलीस ठाण्यात मूकबधिर मुलीवर अज्ञात व्यक्तीने तिच्या सहायतेचा फायदा उठवून बलात्कार केल्याचा संशय होता. तसा गुन्हा दाखल करण्यात आला. बोरिवली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. परंतु त्यांना त्यात फारसे पुढे जाता आले नाही. सदर मुलगी मुकबधिर असल्यामुळे तिच्याकडून सांकेतिक खुणांव्यतिरिक्त काहीही माहिती मिळत नव्हती. मुकबधिरांची सांकेतिक भाषा ओळखणाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही.

दुसरीकडे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कांदिवली युनिटचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. आई-वडिलांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला काहीही आठवत नाही, असे ती सांगू लागली. या दाम्पत्याला आणखी दोन मुले होती. परंतु तीही शारीरिक व्यंग असलेली.. मुकी आणि बहिरी. त्यामुळे त्यांच्याकडूनही काहीही सुगावा पोलिसांना लागला नाही. तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती.

वांद्रे येथील आलियावर जंग इन्स्टिटय़ूटच्या काही शिक्षकांची पोलिसांना मोलाची मदत झाली. याच इन्स्टिटय़ूटमधील दोन प्रशिक्षित मुकबधिर मुलींना काही दिवस सदर मुलीसोबत ठेवण्यात आले. सांकेतिक भाषेवरून या मुलीकडून जुजबी माहिती काढण्यात थोडेसे यश आले. बांधकाम मजूर असलेल्या एकाने बलात्कार केल्याची माहिती यातून मिळाली. त्याचे वर्णनही थोडेफार मिळाले. परंतु तेवढय़ाच माहितीच्या आधारे बलात्काऱ्याचा शोध घेणे कठीण होते. तरीही आढाव आणि त्यांच्या पथकाने प्रयत्न सोडले नाहीत.

सदर मुलगी राहात असलेल्या बोरिवली परिसरात साध्या वेशातील पोलीस तैनात करून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. झोपडपट्टी परिसरात त्या काळात झालेल्या कामांवर असलेल्या बांधकाम मजुरांचीही माहिती गोळा करण्यात आली. याशिवाय इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणच्या मजुरांचीही माहिती गोळा करण्यात आली. तब्बल त्या काळात २०० ते २५० मजूर असल्याचे निष्पन्न झाले. या प्रत्येकाचा संबंध असावा का, या दिशेने तपास सुरू करण्यात आला. अनेकांची छायाचित्रे या मुलीला दाखविण्यात आली. परंतु ती यापैकी कोणालाच ओळखू शकत नव्हती. एका सुपरवायझरने त्या काळात आपण १८ ते २० वर्षे वयोगटातील पाच मुले बांधकाम मजूर म्हणून आणली होती, असे सांगितले. या सर्व मुलांपैकी एक गावी निघून गेल्याचे सांगितले. आतापर्यंत ज्या मजुरांची चौकशी करण्यात आली ते सर्व मजूर तेथेच होते. त्यापैकी १८ ते २० वर्षे वयोगटातील मजूर मोजकेच होते. संबंधित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तो तरुण होता आणि किंचित काळसर रंगाचा होता. त्याच्या अंगाला सिमेंट लागलेले होते. उत्तर प्रदेशमध्ये निघून गेलेल्या या मुलाच्या शोधासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक रईस शेख, रवींद्र भांबिड, संतोष देसाई आदींच्या पथकाने महाराजगंज जिल्ह्यात धाव घेतली. फरिंदा तहसीलमधील विश्रामपूर गावात तो राहात होता. अखिलेश बसफिर असे त्याचे नाव. परंतु तो घरी आढळून आला नाही. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याचा तेथेच शोध घेण्यात आला असता तो दुसऱ्या गावात आढळला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले. त्याच्याकडे याबाबत चौकशी करता त्याने सुरुवातीला आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला. त्याचे छायाचित्रही संबंधित मुलीला दाखविण्यात आले. परंतु तिने त्याला ओळखले नाही. मात्र परिस्थितीजन्य पुरावे त्याच्या विरुद्ध होते.

सदर मुलगी राहात असलेल्या ठिकाणीच अखिलेश काम करीत होता. नजरानजर होऊन तो एकेदिवशी थेट तिच्या घरी गेला आणि तिच्यावर बलात्कार करून तो निघून गेला. त्यानंतर काम सोडून तो गावी निघून गेला. मूकबधिर मुलीला त्यावेळी काहीही सांगता आले नाही. मात्र ती गरोदर राहिल्याने हे प्रकरण बाहेर आले. अखेर अखिलेशने बलात्कार केल्याचे मान्य केले. तिचा गर्भपात करून डीएनए नमुना राखून ठेवण्यात आला होता. आता अखिलेशच्या डीएनए नमुन्याशी तो मिळताजुळता येईलच. ही चाचणी केली जाणार आहे. परंतु आरोपीने कबुली दिल्यामुळे या गुन्ह्याची जुलै २०१७ मध्ये उकल झाली. उत्कृष्ट तपासासाठी पोलीस आयुक्तांमार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्काराचेही गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट अकरा मानकरी ठरले आहे.

निशांत सरवणकर

@ndsarwankar

nishant.sarvankar@expressindia.com