डिसेंबर महिन्यात नागरिकांकडूनवापरात लक्षणीय वाढ
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलात दळणवळणासाठी सुरू करण्यात आलेल्या युलू ई-बाइक सेवेला नागरिकांकडून प्रतिसाद वाढत असून डिसेंबरमध्ये त्यात तिपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. लवकरच अन्य भागांत ही सेवा सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या सेवेचा विस्तार होऊन नागरिकांना नवा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
वांद्रे (पूर्व) ते कुर्ला (पश्चिम) दरम्यान झटपट प्रवास करता यावा यासाठी सप्टेंबरपासून वांद्रे-कुर्ला संकुलात युलु ई-बाइक सेवा सुरू करण्यात आली. नागरिकांकडून सुरुवातीपासूनच या सेवेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये स्थानके आणि ई-बाइकची संख्या वाढविण्यात आली. परिणामी, डिसेंबरमध्ये ई-बाइकला तिप्पट प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.
युलूच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात सुमारे सात हजार प्रवाशांनी ई-बाइकचा वापर केला. यामध्ये सुमारे २० हजार फेऱ्या झाल्या. तर डिसेंबरमध्ये आठ हजार १७० जणांनी युलू ई-बाइक वापरली असून, त्यामध्ये सुमारे २५ हजार फेऱ्या झाल्या. वांद्रे-कुर्ला संकुल आणि वांद्रे (प.) रेल्वे स्थानक या ठिकाणी युलूची एकूण १८ स्थानके असून कुर्ला (प.) स्थानकाबाहेर युलूचे स्थानक नाही. रेल्वेमार्फत उपलब्ध होणारी जागा मर्यादित असल्याने, महापालिकेसोबत बोलणी सुरू असून, महिनाभरात हे स्थानक कार्यरत होईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या युलूच्या ४०० ई-बाइक असून, गेल्या चार महिन्यांत त्यांनी सुमारे तीन लाख किमी अंतर कापले असून, त्यामुळे ३३ हजार किलो कार्बन उत्सर्जन कमी झाल्याचा दावा युलूने केला आहे.
या वर्षीच्या जानेवारीअखेरीस ई-बाइक सुविधांबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि युलू यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. मात्र त्यानंतर टाळेबंदीमुळे ही सुविधा सुरू करण्यास विलंब झाला. शिथिलीकरणादरम्यान विविध कार्यालये सुरू झाली असून सप्टेंबरपासून युलू ई-बाइक सुविधा सुरू करण्यात आली.
एमएमआरडीएच्या माध्यमातून शहर आणि महानगर परिसरात भविष्यात निर्माण होणाऱ्या ३३७ किमी मेट्रो जाळ्याच्या अनुषंगाने ‘फर्स्ट आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी अनेक उपाय योजले जात आहेत. त्याच माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. सामंजस्य करारानुसार ई-बाइक स्थानकांसाठी एमएमआरडीच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली जाईल.
इतर प्रभागांमध्येही सेवा
एमएमआरडीएच्या माध्यमातून वांद्रे-कुर्ला संकुल आणि वाद्रे व कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर युलू ई-बाइक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही सेवा अन्यत्र सुरू करण्याबाबत युलू व्यवस्थापन महापालिकेच्या इतर विभागांशी चर्चा करीत असून, लवकरच त्याबाबत निर्णय होण्याची आशा आहे. त्यामुळे भविष्यात शहरात अन्यत्र युलू ई-बाइक धावताना दिसू शकेल.