रस्त्यावरील मर्यादारेषा अल्पावधीतच गायब

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरधाव वेगाने वाहन चालवून एका मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाची न्यायालयाने त्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग नसल्याचे कारण देत सुटका केल्याचे नुकतेच उघड झाले. या निकालानंतर मुंबईतील झेब्रा क्रॉसिंगच्या अवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग आणि सिग्नलजवळील मर्यादारेषा यांची पाहणी केली असता बहुतांश ठिकाणी या खुणा अस्पष्ट व नाहीशा झाल्याचे दिसून आले. एकीकडे वाहनांची वाढती वर्दळ, प्रदूषण या गोष्टी झेब्रा क्रॉसिंग अल्पावधीतच पुसट होण्यामागे दिली जात असली तरी प्रशासकीय अनास्थेमुळे अशा ठिकाणी पुन्हा खुणा ठळक करण्याचे काम वेळोवेळी होताना दिसत नाही. झेब्रा क्रॉसिंगच्या अभावामुळे भरधाव वाहन चालवणाऱ्या तसेच यासंबंधीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई पोलिसांना अडचणी येत आहेत.

मुंबई शहरात जवळपास २ हजार झेब्रा क्रॉसिंग आहेत. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, जास्त रहदारी असलेले सार्वजनिक व खासगी कार्यालय परिसर, महत्त्वाची ठिकाणे, जंक्शन, सिग्नल आदी परिसरांतील रस्त्यांवर ०.५ रुंदी आणि ४ मीटर लांबीचे झेब्रा क्रॉॅसिंग आखण्यात येतात. त्यापुढे चार इंचांची स्टॉपलाइन (मर्यादारेषा) आखली जाते. दरवर्षी विविध विभागांतील झेब्रा क्रॉसिंगची रंगरंगोटी केली जाते. एखाद्या ठिकाणी अस्पष्ट झालेल्या झेब्रा क्रॉसिंगची कंत्राटदाराकडून रंगरंगोटी करून घेतली जाते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कंत्राटदाराने रंगविलेले झेब्रा क्रॉसिंग अल्पावधीतच काळे पडून कालांतराने दिसेनासे होत असल्याचे आढळून आले आहे. अशा ठिकाणी वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे अपघात होण्याची भीती असते.

दिवसा वाहतुकीच्या रहदारीमुळे काम करता येणे शक्य नसल्यामुळे झेब्रा क्रॉसिंगच्या रंगरंगोटीचे काम रात्री केले जाते. पावसाळ्यापूर्वी हे काम करणे गरजेचे असल्यामुळे शहरातील मुख्य रस्ते, मंत्रालय परिसर, जवळपास २१० हून अधिक शाळांचे परिसर, दक्षिण मुंबई विभागातील मादाम कामा रोड, एन एस हर्डीकर रोड, एम के रोड, एम जी रोड, टी एच कटारिया रोड, रे रोड, लाल नाथ पत्रा रोड, एलिजेंबट रोड, गोखले रोड, वांद्रे वरळी सी लिंक आदी परिसरांत झेब्रा क्रॉसिंगचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. वॉर्डच्या संबंधित अधिकाऱ्यांना परिसराची इत्थंभूत माहिती असते, त्यामुळे ते झेब्रा क्रॉसिंगची योग्य रीतीने देखभाल करू शकतात, त्यामुळे यापुढे झेब्रा क्रॉसिंगचे सर्व काम वॉर्ड स्तरावर करण्याचे योजिले असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

झेब्रा क्रॉसिंग नाहीसे कसे होतात?

’ वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचे काम रात्रीच्या वेळी करावे लागते. परंतु मुंबईत रात्रीही वाहनांची वर्दळ कमी प्रमाणात का होईना सुरू असते. त्यामुळे रंग सुकण्यापूर्वीच त्यावरून वाहने जात असल्याने झेब्रा क्रॉसिंग लवकर पुसट होतात.

’ अनेकदा वाहनचालक वेगाने गाडी आणून सिग्नलजवळ अचानक उभी करतात. अशा वेळी जोरात ब्रेक दाबल्यामुळे चाकांच्या घर्षणामुळेही झेब्रा क्रॉसिंगचा रंग उतरतो.

’ वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरातील कार्बन झेब्रा क्रॉसिंगवर चिकटून त्यावर काजळी चढते व ते दिसेनासे होतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zebra crossing issue raised in mumbai
First published on: 10-05-2017 at 04:38 IST