सदर परिसरातील घटना

नागपूर : सदर आझाद चौक परिसरातील सुमारे ५० वर्षे जुनी इमारत सोमवारी पहाटे कोसळ्ल्याने झोपेत असलेल्या किशोर टेकसुल्तान (४३) यांचा मृत्यू झाला,  तर चार जण जखमी झाले.

सदर येथील एक माळ्याचे कवेलूचे घर मोडकळीस आले होते. या इमातीमध्ये घरमालक आणि दोन भाडेकरू राहत होते. पहाटे  झोपेत असताना एका भाडेकरूच्या मुलीच्या अंगावर माती पडली. त्यामुळे ती जागी झाली आणि तिने इतरांना सांगितले. आरोडाओरड झाली. पहिल्या माळ्यावर झोपलेले किशोर यांना आवाज गेला नाही. काही क्षणात इमारत कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. चौघेजण जखमी झाले.

अग्निशमन विभागाच्या जवानांनी चार लोकांचे प्राण वाचवले. घर कोसळतेवेळी त्यात २० जण होते. त्यापैकी १५ लोकांनी घराबाहेर धाव घेत आपला जीव वाचवला. जखमी व्यक्तींमध्ये प्रभा टेकसुल्तान (५५), लक्ष्मी टेकसुल्तान (६५), लोकेश टेकसुल्तान (२२) आणि राकेश सिहोरिया (३२) यांचा समावेश आहे.

दाटीवाटीच्या आझाद चौकात टेकसुल्तान कुटुंबीयांच्या मालकीचे हे घर आहे. सुमारे ५० वर्षे जुने घर आहे. या घरात टेकसुल्तान कुटुंबासह हजारे व अन्य एक असे दोन कुटुंब भाडय़ाने राहतात. अनेक वर्षांपासून हे दोन्ही भाडेकरू आहेत. घरमालक असलेले टेकसुल्तान हे वरच्या माळ्यावर राहतात. या घरातील एका कुटुंबात ३, दुसऱ्या कुटुंबात १० आणि टेकसुल्तान कुटुंबात सात जण आहेत.  या घटनेनंतर सुगतनगर सिव्हिल लाईन्स, कॉटन मार्केट गंजीपेठ फायर स्टेशनच्या सात वाहनांसह मुख्य अग्निशमन तसेच आपात्कालीन यंत्रणेचे पथक यांनी मदत कार्यात भाग घेतला.

कोसळलेल्या इमारतीला नोटीस नाही

शहरात वेगवेगळ्या भागात १७३ इमारती धोकादायक आहेत. यातील ९७ इमारतींना जूनमध्ये नोटीस देऊन १५ दिवसात पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. जीर्ण इमारतीच्या चार श्रेणी आहेत. सी १मध्ये ९७, सी २अ मध्ये २५, सी२ब मध्ये ३५ आणि सी३ मध्ये १६ इमारतींचा समावेश आहे. ९७ इमातीत राहणाऱ्या १७७ भाडेकरूंना महापाकिलेने नोटीसही बजावल्या आहेत. परंतु सदरमधील सुमारे ५० वर्षे जुनी आणि मोडकळीस आलेल्या इमारतीला नोटीस बजावण्यात आली नव्हती.