बहुउद्देशीय प्रशिक्षण व विपश्यना ध्यान केंद्र होणार

बौद्धांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या ड्रॅगन पॅलेसच्या विकासाकरिता राज्य शासनाने समाज कल्याण विभागाच्या खात्यात १० कोटी रुपयांचा निधी नुकताच जमा केला आहे. त्यातून येथे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र व विपश्यना केंद्र तयार केले जाईल.

ड्रॅगन पॅलेसच्या विकासाकरिता सुमारे ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या निधीतून येथे विपश्यना केंद्र, अद्ययावत प्रशासकीय भवन, बहुउद्देशीय प्रशिक्षण भवन प्रस्तावित करण्यात आले होते.सोबत ४५ आसन क्षमतेच्या प्रत्येकी ६ कार्यशाळा, प्रत्येकी ३०० आसन क्षमतेचे २ परिषद सभागृह, ई-लायब्ररी, निवासी विपश्यना ध्यान केंद्र, संगणक, दळणवळण यंत्रणा, कला दालनासह प्रदर्शन सभागृह, ७५० आसन क्षमतेचे प्रेक्षकगृह, वसतिगृहासह विविध महत्त्वाचे काम या प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले होते. या घोषणेला बरेच दिवस लोटल्यावरही पैसा मिळत नसल्याने त्याचा शासनाला विसर पडल्याचे बोलले जात होते, परंतु शासनाने आपला शब्द पाळत नुकताच ड्रॅगन पॅलेसच्या विकासाकरिता १० कोटींचा निधी समाज कल्याण विभागाच्या खात्यात जमा केला आहे. या निधीतून ड्रॅगन पॅलेस येथे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र, विपश्यना ध्यान केंद्रासह इतर बरीच विकास कामे केली जाईल. या केंद्रामुळे निश्चितच बौद्ध बांधवांना वेगवेगळ्या कौशल्य प्रशिक्षणासह बौद्ध धर्मावर अभ्यासही करणे शक्य होईल. इतरही निधी कामानुरूप लवकरच मिळण्याची आशा सूत्रांनी वर्तवली आहे.

लवकरच कामाचा शुभारंभ -माधव झोड

ड्रॅगन पॅलेसच्या विकासाकरिता शासनाकडून १० कोटींचा निधी मिळाला आहे. लवकरच या निधीतून विविध कामांचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न केला जाईल. या कामामुळे बौद्ध बांधवांना मोठा लाभ होईल, असे मत समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, नागपूर माधव झोड यांनी व्यक्त केले.