अनेक वाहनधारकांच्या नूतनीकरणाच्या तारखा उलटल्या

नागपूर : टाळेबंदीच्या काळात वाहन विमा कंपन्यांनाही कोटय़वधींचा फटका बसला आहे. टाळेबंदीदरम्यान हजारो दुचाकी व तिनचाकी वाहनांचे विमा नूतनीकरणाची तारीख निघून गेल्याने खासगी आणि सरकारी विमा कंपन्यांना शंभर कोटी रुपयांचा फटका एकटय़ा नागपूर शहरातून बसला आहे.

नागपूर हे दुचाकीचे शहर म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. येथे प्रत्येक घरी दोन ते तीन दुचाकी वाहने आहेत. तसेच  नागपूरकर तिनचाकी ऑटोरिक्षाला सर्वाधिक प्राधान्य देतात. यामुळे शहरात ऑटोचालकांचीही संख्याही मोठी आहे. रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा करणे नियमाने बंधनकारक आहे. दरवर्षी नूतनीकरण करुन घ्यावे लागते. मात्र  टाळेबंधीमुळे अवघे राज्य थांबले होते. त्यामुळे सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालय बंद होती.   अशात हजारो दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा विमा एप्रिल आणि मे महिन्यात संपुष्टात आला. विमा कार्यालयापर्यंत वाहन चालक पोहचू शकले नाही. त्यामुळे वाहनाच्या नूतनीकरण देखील झाले नाही.  याचा फटका विमा कंपन्यांना बसला आहे. शहरात सर्वाधिक थर्डपार्टी विम्याला  मागणी आहे. वाहनाच्या वेग क्षमतेनुसार विमा कंपनी त्याचे दर ठरवत असून ते आठशे ते दोन हजाराच्या घरात असतात. परंतु गतवर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल आणि मे या दोन महिन्यात विमा कंपन्यांना ४० टक्के  फटका बसला. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने टाळेबंदीत दरम्यान ज्यांना वाहन विमा नूतनीकरण करता आले नाही अशांना १५ मे पर्यंत मुद्तवाढ दिली होती.मात्र त्याचा फायदा  अद्याप चालकांनी घेतला नाही. आज खासगी व सरकारी क्षेत्रात छोटय़ा मोठय़ा चाळीसहून अधिक वाहन विमा कंपन्या आहेत. नव्या नियमाप्रमाणे नवे वाहन खरेदी केल्यास आता तीन महिन्यांचा वाहन विमा एकदम घ्यावा लागतो. त्यामुळे विम्याचीही रक्कम  वाढली आहे. वाहनाचा अपघात झाल्यास नुकसानाची भरपाई करण्यासाठी विमा आवश्यक आहे. मात्र आजही शहरात बहूतांश दुचाकी वाहन चालक विमा नूतनीकरण करण्यास टाळाटाळ करतात.