प्रादेशिक मनोरुग्णालयाचीच ‘प्रकृती’ खालावली

शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाचीच ‘प्रकृती’ सध्या खालावली असून गेल्या साडेचार महिन्यात येथे उपचार सुरू असलेल्या १२ मनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. राजू दुंडय़ा असे सोमवारी दगावलेल्या रुग्णाचे नाव आहे. मनोरुग्णालयात त्याची प्रकृती खालावल्याने  त्याला प्रशासनाने  गेल्या महिन्यात मेडिकलमध्ये हलवले होते. उपचारादरम्यान १४ मे रोजी तो दगावला.

दरम्यान, या महिन्यातील तेरा दिवसांत मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या लक्ष्मी (५५), मनोज बुरडे (२६), माधुरी (२६) आणि मंदा तडाम (३५) यांचा अनुक्रमे ३, ४, ५, ७ मे रोजी मृत्यू झाला आहे. पाच दिवसांत चार मनोरुग्णांचे मृत्यू झाल्याने आरोग्य खाते हादरले असून आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल आणि मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. फारुखी यांना जाब विचारण्यात आला आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर आरोग्य विभागाने असमाधान व्यक्त केल्याची माहिती आहे.

गेल्यावर्षीही मनोरुग्णालयात झालेल्या मृत्यूपैकी दोन रुग्णांचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले होते. त्यामुळे या मृत्यूसह इतरही मृत्यूंची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. गळा आवळून खून प्रकरणात मनोरुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे, परंतु एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले नसल्याने येथील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे येथे केव्हाही आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वृत्ताला एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

वर्ग एकची बहुतांश पदे रिक्त

मनोरुग्णालयात वर्ग एकच्या मानसोपचार तज्ज्ञांसह विविध प्रशासकीय स्तराची १३ पदे मंजूर आहेत, परंतु त्यातील केवळ एक पद भरले असून इतर काही पदांवर प्रभारी काम करीत आहेत. रुग्णालयात सर्वच संवर्गातील ३७४ च्या जवळपास पदे मंजूर असून त्यातील १०० पदे रिक्त आहेत. ही पदे केव्हा भरली जाणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.