३४० बाधित, १२० रुग्ण करोनामुक्त

नागपूर : नागपूर शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मंगळवारी आजवरची सर्वाधिक मृत्यू संख्या (१७) नोंदवण्यात आली. जिल्ह्य़ात ३४० जण बाधित झाले. यात शहरातील २३५ तर ग्रामीणमधील १०५ रुग्णांचा समावेश आहे.

बाधित रुग्णांपैकी मेयोमधील ७१, मेडिकल ७५, एम्समधील ३६, नीरी २१, माफसू २४, खासगी प्रयोगशाळा ६१ आणि जलद तपासण्या करणाऱ्या ५२ जणांचा समावेश आहे. चाचण्या वाढल्याने बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र वाढती मृत्यूसंख्या चिंतेचा विषय आहे. मंगळवारी एकूण १७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात १५जण शहरातील तर दोन ग्रामीणमधील आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. आतापर्यंत जिल्ह्य़ात करोनामुळे १८९ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंमध्ये पाच जण मेयोतील आहे. त्यात गोधनी मार्गावरील झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी ५७ वर्षीय  पुरुष, पाचपावली येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला, मोमिनपुरा येथील ५१ वर्षीय पुरुष, नारी मार्गावरील म्हाडा कॉलनीतील ८० वर्षीय ज्येष्ठ महिला, पांढुर्णा येथील ३५ वर्षीय तरुण आणि चंदननगरातील ८० वर्षीय  महिलेचा समावेश आहे.

मंगळवारी एकूण १६९३ जणांचे नमुने तपासण्यात आले. तपासणीची एकूण संख्या ८९,०३७ इतकी झाली. जिल्ह्य़ात बाधितांची  एकूण संख्या ६,४८३ वर गेली आहे. मंगळवारी १२० जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत  एकूण ३८७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यात ग्रामीण १६५५ व शहरातील २२१९ रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत २४२० रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचा नागपूर जिल्ह्याचा दर ६० टक्के आहे.