इंडस हेल्थ प्लसचा अहवाल प्रसिद्ध; जागतिक तंबाखू विरोधी दिन आज
इंडस हेल्थ प्लसच्या शारीरिक अनियमितता अहवालात नागपूरचे २५ टक्के पुरुष व महिला धूम्रपानामुळे ह्रदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांनी ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सिगारेट व विडीमध्ये असलेल्या तंबाखूमुळे हा आजार बळावत असून, ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन असल्याने त्या निमित्याने घेतलेला हा आढावा.
nag03जगभरात होणाऱ्या मृत्यूंना आणि आजारांना तंबाखू सेवन हे एक मोठे कारण ठरू लागले आहे. भारतातील सर्व प्रकारच्या कर्करोगांपैकी ३० टक्के कर्करोगांना तंबाखू जबाबदार आहे. जानेवारी- २०१५ ते एप्रिल- २०१६ या कालावधित शारीरिक अनियमिततेसंबंधीच्या इंडस हेल्थ प्लस या प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीत आघाडीच्या कंपनीने वितरण भागीदार असलेल्या ‘अ‍ॅडवान्स्ड इमेजिंग पॉइंट’सह नागपुरात एक सर्वेक्षण केले. अहवालात हे सिद्ध झाले की, शहरातील १८ टक्के लोक हे धूम्रपानामुळे श्वसनविषयक आजारांच्या धोक्याखाली जगत आहे. अभ्यासाकरिता शहरातील २५ हजार ६६१ जणांचे नमुने घेण्यात आले. त्यात शहरातील जवळपास २५ टक्के पुरुष व महिला धूम्रपानामुळे ह्रदय व रक्तवाहिन्यांसबंधी आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळून आले.
नागपूरमधील २५ ते ३५ वर्षे वयोगटातील महिला धूम्रपान करतात, त्यातील २ ते ४ टक्के महिला गुटखा व इतर स्वरूपात तंबाखूचे सेवन करतात. तंबाखूत असलेल्या निकोटीनमुळे हाडांवर गंभीर परिणाम होतात. नियमितपणे धूम्रपान करणाऱ्या मध्यम वयोगटातील ६ ते ८ टक्के लोकांना हाडांच्या घनतेशी संबंधित समस्याही मोठय़ा प्रमाणात भेडसावतात. त्यातील ४५ ते ५० वर्षे वयोगटातील लोक श्वसनविषयक आजारांपासून ग्रस्त असल्याचेही अहवालात पुढे आले. शहरातील ८० टक्के सीओपीडी केसेस तंबाखूरहित धूम्रपानामुळे झाल्याचे आढळले आहे. नागपूरमधील ३० ते ३५ टक्के वयोगटातील १४ टक्के पुरुष महिलांच्या तुलनेत सीओपीडीपासून ग्रस्त आहेत.

स्टाईल म्हणून युवकांचे धूम्रपान
शहरातील १० टक्के युवा पिढी सहयोगी कर्मचाऱ्यांच्या त्रासामुळे, स्टाईल म्हणून धूम्रपान वा धूम्रविरहित तंबाखूचे सेवन करतात. तर ११ टक्के युवक तणावामुळे धूम्रपान करतात. डांग्या खोकला व छातीतील संसर्गाच्या केसेस नागपूर शहरी व अर्थ शहरी भागातील मध्यम वयोगटातील लोकांमध्ये आढळून आल्या आहेत. ७ ते १० टक्के लोकांना त्यांच्या फुफ्फुसाचे आयुर्मान १० वर्षांनी कमी होण्याचा धोका आहे आणि तंबाखूच्या सेवनामुळे वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे अहवालात पुढे आले आहे.

तंबाखूचे सेवन केल्यामुळे सीओपीडी, पक्षाघाताचा झटका, ह्रदयविकाराचा झटका, दमा, फुफ्फुसांचा कर्करोग, श्वसनाचा आजार, मधुमेह अशा आजारांचा धोका वाढतो. तंबाखूचे सेवन थांबवल्यास आणि सकस आहार घेतल्यास आरोग्याचे धोके कमी होऊ शकतात. तंबाखूचे सेवन बंद व्हावे म्हणून जनजागृतीची गरज आहे.
अमोल नायकवडी, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, इंडस हेल्थ प्लस