योग्यता तपासणीकडे पाठ दाखवणे भोवले

महेश बोकडे, नागपूर</strong>

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या २८५ पैकी २९ ‘स्कूलबस, स्कूलव्हॅन’ची अद्याप योग्यता तपासणी न झाल्याने शहर ‘आरटीओ’ कार्यालयाने त्यांचे वाहतूक परवाने सोमवारी निलंबित केले. त्यामुळे नियम मोडणाऱ्या स्कूलबस चालकांचे धाबे दणाणले आहे.

नागपूर जिल्ह्य़ातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी नागपूर शहर, पूर्व नागपूर आणि नागपूर ग्रामीण प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) प्रशासनाने शाळा सुरू होण्याआधी  म्हणजेच १६ जूनपूर्वी जिल्ह्य़ातील सर्व स्कूलबस, स्कूलव्हॅनची योग्यता प्रमाणपत्रासाठी फेरतपासणीचे आवाहन केले होते. मात्र, त्याला स्कूलबस व स्कूलव्हॅन मालक-चालकांनी प्रतिसाद दिला नाही. नागपूर शहर आरटीओ कार्यालयातील ८५६ पैकी ७२७ स्कूलबस, पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील १०७४ पैकी ९१८ स्कूलव्हॅनची योग्यता तपासणी सबंधितांनी करून घेतली आहे. अद्याप दोन्ही कार्यालयांतील २८५ वाहने तर नागपूर ग्रामीणच्या सुमारे १,५०० तपासणीविनाच आहेत.

उर्वरित सुमारे साडेतीनशेहून अधिक बसची अद्याप तपासणी झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. तपासणी न करणाऱ्या सर्वच वाहनांना आरटीओ कार्यालयाकडून परवाना निलंबनाची नोटीस पाठवली आहे. त्यातील शहर आरटीओ कार्यालयाने सर्वात आधी २९ बसच्या परवाना निलंबनावर सोमवारी शिक्कामोर्तब केले.

स्कूलबसचे दर अनियंत्रित

शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक शाळेत एक शालेय बस परिवहन समिती स्थापन केली जाते. यात संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, आरटीओ आणि वाहतूक पोलीस खात्याचे प्रतिनिधी, पालक प्रतिनिधींचा समावेश असतो. समितीला स्कूलबसचे दर निश्चित करण्याचे अधिकार असतात. मात्र शाळा संचालक समितीला विश्वासात न घेताच दर वाढवते. दरम्यान, विद्यार्थ्यांची शाळा  केवळ ९ महिने सुरू राहते पण  पालकांकडून १० ते १२ महिन्यांचे शुल्क घेतले जाते.

महिनाभरात २७ वाहने जप्त

नागपूर शहर आरटीओ कार्यालयातील वायूवेग पथकांने गेल्या महिन्यात १०३ स्कूलबस, स्कूलव्हॅनची तपासणी केली. यापैकी २९ वाहने सदोष आढळली. त्यातील २७ वाहने जप्त करून त्यांच्यावर २ लाख ७७ हजार ३५६ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

आरटीओच्या माध्यमातून स्कूलबस, स्कूलव्हॅनची नियमित तपासणी केली जाते. त्याअंतर्गत २९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पुढेही केली जाईल. स्कूलबस, स्कूलव्हॅन चालकांकडून घेतल्या जाणाऱ्या दराबाबत शालेय बस परिवहन समितीकडून काही करता येईल काय? यासाठी प्रयत्न केले जाईल.

– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)