नागपूर येथून घोडाझरी येथे सहलीसाठी आलेल्या महिलांचा ट्रॅक्टर रविवार घोडाझरी-खडकी मार्गावर उलटल्याने ४६ जणी जखमी झाल्या. काही महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नागपूर येथील काही महिला सकाळी ट्रॅव्हल्सने घोडाझरी पर्यटनस्थळ बघण्यासाठी आल्या होत्या. घोडाझरीच्या आत ट्रॅव्हल्स जात नसल्याने त्यांनी चिंधीचक मार्गावरील खडकी-घोडाझरी मार्गाने ट्रॅव्हल्स नेली. त्यानंतर ट्रॅव्हल्स खडकी येथे ठेवून त्या पायदळ घोडाझरी येथे गेल्या. बोटिींग व पर्यटनाचा आनंद घेऊन परतीला निघाल्यावर त्यांना ट्रॅक्टर दिसला. ट्रॅक्टरचालकाला विनंती करून त्या ट्रॅक्टरमध्ये बसल्या. दरम्यान, उतारावरून ट्रॅक्टर उलाटल्याने ४६ महिला जखमी झाल्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजपूत यांनी घटनास्थळाला भेट देऊन सर्व महिलांना नागपूरला रवाना केले. त्यातील काही महिलांना नागपुरात खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.