‘बर्ड फ्लू’चा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यभरात आतापर्यंत बाधित क्षेत्रातील ७२ हजार  कोंबडय़ा नष्ट करण्यात आल्या आहेत.

ज्या भागात ‘बर्ड फ्लू’चे  नमुने सकारात्मक आले त्या भागातील १० किलोमीटर परिसरात तीन महिने पाहणी करून नमुने घेतले जात आहेत. या काळात जर संसर्ग दिसून आला नाही तर हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्रातून मुक्त केले जाणार आहे.

कोंबडय़ांच्या मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने झाल्याचे स्पष्ट झाल्यावर संबंधित स्थळापासून एक किलोमीटरचा परिसर नियंत्रित क्षेत्र घोषित करून त्या भागातील कोंबडय़ा व इतर पक्षी नष्ट केले जातात. आतापर्यंत ७२ हजार १०६ कोंबडय़ा नष्ट करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून कळवण्यात आले. नष्ट केलेल्या कोंबडय़ांसाठी शासनाकडून मदत दिली जात आहे.

दरम्यान, दोन आठवडय़ांपूर्वी नागपूर जिल्ह्य़ातील बुटीबोरीजळील एका पोल्ट्री फार्ममधील कोंबडय़ांना बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यानंतर आतापर्यंत एकही नमुना सकारात्मक आला नाही. जिल्ह्य़ातील साथ आता पूर्णपणे आटोक्यात  असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. काणे यांनी सांगितले.

२०,१९८ विविध पक्ष्यांचा मृत्यू

पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ८ जानेवारीपासून आतापर्यंत २०,१९८ विविध पक्ष्यांचा ‘बर्ड फ्लू’मुळे मृत्यू झाला. दोन आठवडय़ापासून यात घट होत  आहे. २ फेब्रुवारीला राज्यात सोलापूर (३४), धुळे (८०), अहमदनगर (१६) आणि अकोला (१४) येथे एकूण १४४ कोंबडय़ांचा मृत्यू झाला होता. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.