कामे पूर्ण होण्यापूर्वीच वाहतूक सुरू; कंत्राटदारांकडून दुर्लक्ष; महापालिकाही सुस्त

अर्धवट काम पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्यावरून वाहतूक सुरू केल्याने हे रस्ते अपघाताचे केंद्रबिंदू ठरू लागले आहेत. रस्ते दुभाजकाच्या ठिकाणी असलेल्या खड्डय़ात पडून जखमी होणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून महापालिका आणि कंत्राटदार यांचे त्याला सोयरसूतक नाही, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

शहरात सिमेंट रस्ते बांधणीचा महापालिका आणि तेथील सत्ताधाऱ्यांनी खूप गवगवा केला. मात्र, मागील दोन वर्षांपासून या रस्त्यांची कामेच पूर्ण होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना होत असलेला त्रास याची कोणीच दखल घेत नाही, कंत्राटदाराची मनमानी वाढली आहे. वाहतुकीची कोंडी, रस्त्यावर असलेले खड्डे यामुळे अपघात होऊन अनेकांचे प्राणही गेले आहेत. ज्यांच्यासाठी हे रस्ते तयार केले जात आहे, त्यांनाच त्याचा इतका त्रास होऊ लागला की नको हे रस्ते असे नागरिक आता उघडपणे बोलू लागले आहेत.

काही भागात एकाबाजूचे तर काही भागात दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले, मात्र उर्वरित कामे तशीच पडून आहेत. रस्ते दुभाजक लावलेले नाहीत, ती जागा मोकळीच आहे. दोन रस्त्याच्या मध्ये असलेल्या या रुंद आणी खोल जागेमुळे रात्रीच्या वेळी अनेक दुचाकीस्वारांना अपघात झाले आहेत. ज्या रस्त्याचे एका बाजूने सिमेंटीकरण झाले आहे त्याची दुसरी बाजू खडतर आहे. रस्ते जमिनीपासून उंचावर असल्याने वाहने घसरण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे, रस्ते पूर्ण होण्यापूर्वीच वाहतूक सुरू करण्यात आली आहे. धोकादायक ठिकाणी फलक किंवा कठडे लावण्यात आले नाही. दीक्षाभूमीकडून नीरीकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने गतीने करण्यात आले. रस्त्यांच्या कामाचा दर्जा बघता संबंधित कंत्राटदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मार्गावरचे सिमेंटीकरण करण्यात आले आणि दोन महिन्यापासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, रस्ते दुभाजक लावले नाही, तेथे काळी माती टाकण्यात आली आहे. ती आता बाहेर येऊ लागली असून त्यावरून वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. दोन दिवसांपूर्वी वसंतनगरमधून येणाऱ्या एका महिलेची दुचाकी रस्ता दुभाजकामध्ये अडकल्यामुळे त्या खाली पडल्या आणि त्यात त्यांना दुखापत झाली. यापूर्वी ४५ वर्षीय गृहस्थाला अशाच प्रकारचा अपघात झाला होता. शहरातील अनेक भागात सिमेंट रस्त्यावर अशीच स्थिती आहे.

महापालिका प्रशासनाकडे या संदर्भात वसंतनगरातील नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. रिंग रोड ते आंबेडकर पुतळा, सक्करदरा ते दत्तात्रयनगर चौक, गुरुदेवनगर चौक ते ईश्वरनगर चौक, सुनील हॉटेल ते टेलिफोन एक्सचेंज चौक या सिमेंट मार्गावर अशीच परिस्थिती आहे.

दीक्षाभूमी ते नीरी या मार्गाचे सिमेंटीकरण करताना मध्ये रस्ता दुभाजक न करता सरसकट रस्ता तयार केला जाणार होता, परंतु प्रशासनाकडून रस्ता दुभाजक लावण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे दोन भागात रस्त्याचे काम करण्यात आले. रस्ता दुभाजकावरील काही भागात मीडियम ब्लॉक लावण्यात आले आहे, तर काही भागात माती टाकण्यात आली आहे. त्या ठिकाणी कठडे लावण्यात आले आहेत, पण संबंधित कंत्राटदाराला दुभाजकाच्या कामाला उशीर का होतो, याची माहिती घेण्यात येईल.

नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता, महापालिका